Pune Rain आयुक्तांनी फोडले पावसावर खापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

काल हवामान खात्‍याने ऑरेंज अलर्ट दिला होता

Pune Rain : आयुक्तांनी फोडले पावसावर खापर

पुणे : शहरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराची दाणादाण उडालेली असताना महापालिकेच्या कामावर नागरिकांनी प्रश्‍न उपस्थित केले आहेत. मात्र, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शहर तुंबण्याचे खापर पावसावर फोडले आहे.

शहरात ६० ते ६५ मिलिमीटर (मिमी) पावसाचे पाणी वाहून नेण्याची पावसाळी गटारांची क्षमता आहे, पण अडीच तासात १०५ मिमी पाऊस पडल्याने ही स्थिती निर्माण झाली. कालचा पाऊस म्हणजे ढगफुटीच होती, असा दावा आयुक्त कुमार यांनी केला आहे.

विक्रम कुमार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. पुण्यात ६५ मिमी पाऊस पडल्यानंतर अतिवृष्टी मानली जाते. पण इथे त्यापेक्षाही दुप्पट पाऊस पडला. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले, रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले.

१८ वस्त्यांमध्ये पाणी घुसले, दोन ठिकाणी भिंत पडली पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महापालिकेने पावसाळी गटारांची केलेली व्यवस्था ही ६० ते ६५ मिमीच्या क्षमतेनुसार केलेली आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी आले. रस्त्यावरची माती, प्लास्टिक व इतर कचरा पाण्यासोबत वाहून गेल्याने पावसाळी गटारी तुंबल्या होत्या. हा कचरा काढून पाण्याचा निचरा होण्यासाठी आमची टीम रात्रभर काम करत होती.

सिमेंट रस्ता करताना पावसाळी गटार टाकल्या जातातच, पण पाऊस जास्त पडत असल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे. शुक्रवारी ७८ मिमी पाऊस पडला, त्यानंतर काल १०५ मिमी पाऊस पडला, त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली.

काल हवामान खात्‍याने ऑरेंज अलर्ट दिला होता, त्यामळे ६५ मिमीपर्यंत पाऊस पडणे आवश्‍यक होते. पण १०५ मिमी पाऊस झाल्याने पाणी तुंबले. तसेच मेट्रोने काम करताना बेरिकेडिंग लावले आहे. तेथे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था पाणी तुंबले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बॅरिकेंडींग काढून टाकून पाण्याला वाट करून दिली, असेही कुमार यांनी सांगितले.

१८८२ नंतर यंदा सर्वाधिक पाऊस

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. १८८२ नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात आॅक्टोबर महिन्यात पाऊस पडत आहे. आत्तापर्यंत आॅक्टोबर महिन्यात आत्तापर्यंत २१० मिमी पाऊस झालेला आहे. पुण्यात दरवर्षी सरासरी ७०० मिमी पाऊस पडतो, पण यंदा १ हजार मिमी पाऊस झाला आहे. कमी वेळात जास्त पाऊस पडत असल्याने हा साधारण पाऊस नाही तर ढगफुटीचा प्रकार आहे. ही एक प्रकारची नैसर्गिक आपत्ती आहे.

पावसाळी गटार टाकताना मागील १०० वर्षातील पावसाचा विचार करून ६० ते ६५ मिमी पाऊस पडला तरी त्याचे पाणी वाहून जाईल अशी व्यवस्था केली आहे. पण पाऊस पडण्याचे प्रमाण वाढत असल्याने शहरातील महत्त्वाचे रस्ते, चौक या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी पावसाळी गटारांची क्षमता वाढविण्यासाठी आम्ही नियोजन करू, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.