भानुशाली खूनप्रकरणाचे पुणे कनेक्शन

पांडुरंग सरोदे
बुधवार, 23 जानेवारी 2019

पुणे - गुजरातमधील माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष जयंती भानुशाली यांच्या खून प्रकरणामध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून गुजरात पोलिसांनी पुण्यातील पाच तरुणांची चौकशी केली आहे. यासाठी गुजरात पोलिसांनी आठवडाभर पुण्यात मुक्काम ठोकला होता. 

संशयित तरुण हे एका हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. संघटनेच्या वादग्रस्त नेत्याबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमात ते सहभागी असल्याची माहिती पुढे आली आहे

गेल्या आठवड्यात आठ जानेवारीला भानुशाली हे सयाजीनगरी रेल्वेने भुजवरून अहमदाबादला जात होते. त्या वेळी मालिका येथे त्यांच्या एसी कोच डब्यामध्ये घुसून काही जणांनी त्यांच्यावर गोळीबार करत, त्यांचा खून केला होता. या खुनामुळे गुजरातमधील राजकीय क्षेत्रामध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर गुजरात पोलिसांच्या गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण आरपीएफ अशा वेगवेगळ्या पोलिस तपास यंत्रणांकडून तपास केला जात होता. त्यामध्ये बदला, राजकीय वाद, वर्चस्वाची लढाई व सेक्‍स सीडी प्रकरण या चार शक्‍यता गृहीत धरून तपास केला जात आहे.

गुजरात पोलिसांकडून येरवडा भागात राहणाऱ्या तरुणांवर भानुशाली यांच्या खुनासंदर्भात संशय व्यक्त केला जात होता. त्यापैकी दोघांना ताब्यात घेऊन, चौकशीसाठी गुजरातला नेल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

अमित शहा यांची भेट 
भानुशाली हे केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांचे समर्थक आहेत. रुपाला यांना गुजरातचे मुख्यमंत्री करावे, यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली होती. त्या वेळी आपल्याकडे ४० आमदार असून, रुपाला यांना मुख्यमंत्री करा, अन्यथा ४० आमदारांना घेऊन बाहेर पडू, असा इशारा भानुशाली यांनी दिल्याची चर्चा आहे. 

कोण आहेत भानुशाली? 
गुजरातमधील निवडणुकीत अबडसा मतदारसंघासाठी भानुशाली यांच्याऐवजी भाजपने काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या छबील पटेल यांना उमेदवारीची संधी दिली होती. मात्र, पटेल यांना या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पटेल व भानुशाली यांच्यामध्ये वाद झाले होते. त्यावरून भानुशाली यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोपही केले होते. 

Web Title: Pune Connection of Bhanushi murder case