भाजपच्या तंबूत नक्की जागा किती?

संभाजी पाटील 
रविवार, 8 सप्टेंबर 2019

बाप्पांना निरोप दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. तळ्यात मळ्यात असणारे विरोधी पक्षातील नेते भाजपच्या तंबूत दाखल होतील. नेमका कोणाचा पक्ष कोणता, हे मतदारांना अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच समजेल.

विधानसभा 2019
बाप्पांना निरोप दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. तळ्यात मळ्यात असणारे विरोधी पक्षातील नेते भाजपच्या तंबूत दाखल होतील. नेमका कोणाचा पक्ष कोणता, हे मतदारांना अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच समजेल. ‘इनकमिंगला’ फारशी संधी नसणाऱ्या पुणे जिल्ह्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा संभाव्य भाजपप्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का असेल. मात्र, ‘रणछोडदास’ नेते पक्ष सोडून गेल्याने नव्या कार्यकर्त्यांना निर्माण झालेली संधी तेवढीच सकारात्मक असेल. पक्ष सोडून गेलेल्यांसाठी साखर वाटणारे कार्यकर्तेच काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही जोमाने लढण्याची हिंमत देतील हे नक्की.

मुख्यमंत्रिपद आपल्याकडे राहावे यासाठी भाजप आणि शिवसेनेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपापल्या पक्षात ओढण्याची जणू स्पर्धा सुरू आहे. येत्या आठ-दहा दिवसांत त्याला आणखी जोर येईल. २०१९ची विधानसभा निवडणूक ही पुढील काही काळ पक्षांतरासाठी सर्वांच्या स्मरणात राहील. भाजपमध्ये प्रवेश ‘इज इक्वल टू’ मंत्रिपद, सहकारी संस्थेवर असलेल्या कर्जफेडीची हमी, गैरव्यवहारांच्या चौकशीत अडकला असाल, तर त्यापासून मुक्त करण्याचे आश्‍वासन, असे समीकरण असल्याने नेते पक्ष सोडून जात आहेत, या वक्तव्याला फारसा अर्थ नाही. वर्षानुवर्षे सत्ता उपभोगण्याची लागलेली सवय आणि विजयाची खात्री यासाठी पक्षांतर होत आहेत, हे सांगण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाची गरज नाही.

१९९५ ते २०१४ पर्यंत मंत्रिपद उपभोगलेले हर्षवर्धन पाटील आता भाजपमध्ये जाणार या बातमीचे खरे तर फारसे आश्‍चर्य वाटायला नको. विधानसभेत पराभूत झाल्यापासूनच हर्षवर्धन अस्वस्थ होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये यावे, यासाठी बराच प्रयत्नही झाला होता; पण लोकसभेनंतर संपूर्ण देशातील वातावरण बदलेल, अशी त्यांना असणारी अपेक्षा फोल ठरली. इंदापूरची जागा काँग्रेसला सोडली जाणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासगीत सांगत होते; पण राज्यातील एकूण राजकीय वातावरण पाहता सत्ता मिळण्याची शाश्‍वती नसल्यानेच पाटील यांनी भाजपचा विचार केला असावा. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला बारामती, आंबेगाव, भोर आणि इंदापूर या चार जागांचीच खात्री आहे. पुरंदरमध्येही या वेळी चांगले वातावरण आहे. असे असताना हर्षवर्धन यांनी केलेला वेगळा विचार काँग्रेसला निश्‍चित धक्का ठरेल. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर जिल्ह्यात काँग्रेसला झोकून देणारा नेता उरला नव्हता. माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि त्यानंतर पाटील यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व आले होते; पण मंत्रिपद असूनही पाटील यांना जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसशी दोन हात करून पक्षाला मोठे करण्यात यश आले नाही, हे मान्य करावे लागेल. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शहर विरुद्ध जिल्हा असा भाजपमध्ये सत्तासंघर्ष होणार हे मात्र नक्की.

पुणे शहरात आठही आमदार भाजपचे आहेत. शहरातील ज्येष्ठ नेते गिरीश बापट हे खासदार झाल्याने साहजिकच शहर आणि जिल्ह्यावर वचक ठेवणारे दुसरे नेतृत्व भाजपकडे आजतरी राहिलेले नाही. त्यामुळे बापट यांच्यानंतर शहराला मंत्रिपद मिळाले नाही. लोकसभा, विधानसभा, महापालिका हा तीनही महत्त्वाच्या ठिकाणी भाजपला पूर्ण विजय देऊनही पुण्याला मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले, तर तो शहरातील मतदारांवरच अन्याय होईल. त्यामुळे भाजपच्या तंबूत आणखी किती उंट दाखल होणार, याची भीती पक्षाशी वर्षानुवर्षे प्रामाणिक असणारे कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. दुसरीकडे पक्षातून नेते गेले याचा आनंद व्यक्त करणारे, पुण्यात साखर वाटणारे काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षासाठी नवी फळी तयार करण्याचा विचार करीत आहेत, ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल. विधानसभा निवडणुकीचे मैदान लढाईसाठी येत्या चार-पाच दिवसांत खुले होईल. त्या वेळी मैदान मारण्यासाठी कोण कोणाचा कसा वापर करतो, हे बघण्यासारखे असेल. त्या वेळी खरी परीक्षा असेल ती योग्य निवडीचा अधिकार असणाऱ्या मतदाराचीच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune constituency bjp