राष्ट्रवादीचा भाजपला लगाम | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

मतदानापूर्वी भाजप सर्वच जागांवर विजय मिळविणार, अशी शक्‍यता वर्तविली गेली होती. मात्र, मतमोजणीला सुरवात झाली आणि भाजपला धक्के बसू लागले. चुरशीच्या लढतीत भाजपने सहा जागा राखल्या; पण वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघ त्यांना गमवावा लागला. या मतदारसंघांत राष्ट्रवादीने वर्चस्व सिद्ध केले.

पुणे - पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांचा निकाल उत्कंठा वाढविणाराच नाही; तर आश्‍चर्याचे धक्के देणाराही ठरला. मतदानापूर्वी भाजप सर्वच जागांवर विजय मिळविणार, अशी शक्‍यता वर्तविली गेली होती. मात्र, मतमोजणीला सुरवात झाली आणि भाजपला धक्के बसू लागले. चुरशीच्या लढतीत भाजपने सहा जागा राखल्या; पण वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघ त्यांना गमवावा लागला. या मतदारसंघांत राष्ट्रवादीने वर्चस्व सिद्ध केले.

कोरेगाव पार्क भागातील धान्य गोदामात आज सकाळी मतमोजणी सुरू झाली. मतमोजणी सुरू असताना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये चुरस रंगू लागली. त्यामुळे भाजपविरोधी गोटामध्ये उत्साह संचारू लागला. कोथरूडसारख्या भाजपचा बालेकिल्ला मानल्या गेलेल्या मतदारसंघातही सुरवातीच्या फेऱ्यांमध्ये चंद्रकांत पाटील यांना मनसेचे किशोर शिंदे यांनी जोरदार लढत दिली. शेवटच्या टप्प्यात मात्र पाटील यांनी विजय मिळविला.

हडपसरमधीलल लढतीत राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांनी भाजपकडील जागा खेचून घेतली. त्यांनी योगेश टिळकेर यांचा पराभव करून त्यांच्या पक्षाचे खाते उघडले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. घोषणाबाजी, गुलालाची उधळण करीत त्यांनी विजयोत्सव साजरा केला. वडगावशेरी मतदारसंघात जगदीश मुळीक आणि राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांच्यात सामना झाला. विकासकामांमुळे मुळीक यांचा विजय पक्का असल्याचा दावा भाजपकडून केला जात होता. पण त्याला टिंगरे यांनी धक्का देत, मागील पराभवाचा वचपा काढत मुळीक यांचा पराभव केला. या दोन जागा  आल्याने राष्ट्रवादीच्या जल्लोषात भर पडली.

खडकवासला मतदारसंघातही राष्ट्रवादीने भाजपला झुंज दिली. सुरवातीला भाजपचा पराभव होतो की काय, अशी स्थिती होती. परंतु नंतर भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी आघाडी घेतली. पण तापकीर आणि राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांच्यात चुरस कायम राहिली. या मतदारसंघात अखेर तापकीर यांनी बाजी मारत विजयाची हॅटट्रिक केली. पर्वती मतदारसंघात भाजपच्या माधुरी मिसाळ आणि महाआघाडीच्या अश्‍विनी कदम यांच्यात लढत झाली. परंतु ही लढत एकतर्फीच झाली. मिसाळ यांनीही विजयाची हॅटट्रिक केली आहे. शिवाजीनगर मतदारसंघात माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे आणि काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यात चुरस झाली. आधीच्या फेऱ्यांमध्ये बहिरट यांनी आघाडी घेत भाजपच्या गोटातील धडधड वाढविली. या लढतीत विजय मात्र शिरोळे यांचा झाला. पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरली. भाजपचे सुनील कांबळे आणि काँग्रेसचे रमेश बागवे यांच्यात ही अटीतटीची लढत झाली. परंतु  विजय मिळविण्यात कांबळे यशस्वी ठरले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune constituency result