गेल्या वर्षीपेक्षा एप्रिलमध्ये पुणे "कूल' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

पुणे - यंदा उन्हाळ्याच्या सुरवातीलाच महाराष्ट्र देशातील उष्ण राज्य ठरले असले तरीही, पुणे मात्र एप्रिलमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत "कूल सिटी' म्हणून नोंदली गेली आहे. पुण्यात गेल्या वर्षी एप्रिलच्या मध्यावर सलग सहा दिवस कमाल तापमानाचा पारा चाळिशीच्या वर होता. यंदा मात्र, एप्रिलमध्ये फक्त दोन वेळा कमाल तापमानाने चाळिशी पार केली आहे. 

पुणे - यंदा उन्हाळ्याच्या सुरवातीलाच महाराष्ट्र देशातील उष्ण राज्य ठरले असले तरीही, पुणे मात्र एप्रिलमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत "कूल सिटी' म्हणून नोंदली गेली आहे. पुण्यात गेल्या वर्षी एप्रिलच्या मध्यावर सलग सहा दिवस कमाल तापमानाचा पारा चाळिशीच्या वर होता. यंदा मात्र, एप्रिलमध्ये फक्त दोन वेळा कमाल तापमानाने चाळिशी पार केली आहे. 

सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात राजस्थानमध्ये कमाल तापमानाचा पारा वाढलेला असतो, अशी आपली आतापर्यंतची माहिती आहे; पण या वर्षी राजस्थानमधील फालोडी, चुरू आणि बारमेर या भागात जेमतेम सहा दिवस उच्चांकी तापमानाची नोंद झाली. गुजरातमधील अम्रेली आणि सुरेंद्रनगर या भागातही दोन दिवस देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली; पण एप्रिलच्या मध्यानंतर महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात उष्णतेची लाट निर्माण झाली. त्यामुळे या वर्षी महाराष्ट्र हे देशातील सर्वांत उष्ण राज्य म्हणून हवामान खात्याच्या दफ्तरी नोंदले गेले आहे. चंद्रपूर, वर्धा, मालेगाव, ब्रम्ह्मपुरी, अकोला आणि आता परभणी या भागात कमाल तापमानाची सातत्याने 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंद होत आहे. या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षीच्या तुलनेत पुणे यंदा "कूल सिटी' म्हणून नोंदली जात असल्याचे निरीक्षण हवामानतज्ज्ञांनी नोंदविले आहे. 

चाळिशीपेक्षा कमी तापमानाचे कारण 
शहर आणि परिसरात एप्रिलच्या सुरवातीला पावसाळी वातावरण तयार झाले होते. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने या वर्षी कमाल तापमान 15 एप्रिलपर्यंत 39 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदले गेले. 20 आणि 25 एप्रिल रोजी या महिन्यातील सर्वाधिक म्हणजे 39.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

का वाढतो राज्यातील तापमानाचा पारा? 
राजस्थान येथून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातही उष्णतेची लाट निर्माण होते. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याबरोबरच पुण्यावरही या वाऱ्याचा प्रभाव पडतो. त्यामुळे पुण्यात कमाल तापमानाचा पारा एप्रिलमध्ये सरासरीपेक्षा वाढतो. 

एप्रिलमधील तापमानाची तुलना 
तापमान ........................................... 2017 ............... 2018 
सरासरीपेक्षा कमी नोंदलेल्या तापमानाचे दिवस ...... 6 .................... 6 
37 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान ................ 18 .................. 22 
40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ...................... 6 .................... 2 
(पुण्यात एप्रिलमधील सरासरी तापमान ः 37.3 अंश सेल्सिअस) 

- गेल्या वर्षी एप्रिलमधील उच्चांकी कमाल तापमान ः 40.7 अंश सेल्सिअस 
- यंदा एप्रिलमध्ये आतापर्यंतचे उच्चांकी कमाल तापमान ः 40.4 अंश सेल्सिअस 
- गेल्या वर्षी एप्रिलमधील उच्चांकी किमान तापमान ः 25.7 अंश सेल्सिअस 
- यंदा एप्रिलमध्ये आतापर्यंतचे उच्चांकी किमान तापमान ः 25.2 अंश सेल्सिअस 

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील वाऱ्याच्या प्रभावामुळे एप्रिलच्या सुरवातीला आणि मध्यावधीत पुणे परिसरात पाऊस पडला. त्यामुळे एप्रिलमध्ये राज्याच्या इतर भागात उष्णतेची लाट निर्माण झाली असली तरीही पुण्यात कमाल तापमानाच्या पाऱ्याने सरासरी ओलांडली नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिलमध्ये पुणे थंड राहिले. 
ए. के. श्रीवास्तव, हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान खाते. 

Web Title: pune cool city