पुणे : सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची घोषणा

राज्यातील २७ हजार १३८ सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकांचा तिसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणूका
सहकारी संस्थांच्या निवडणूकाsakal

पुणे : कोरोना संसर्गामुळे मागील काही महिन्यांपासून रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची घोषणा राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी शुक्रवारी (ता.२६) केली. यानुसार राज्यातील २७ हजार १३८ सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकांचा तिसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक होणार असलेल्या सहकारी संस्थांमध्ये कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था, इतर सहकारी संस्थांचा समावेश आहे.

लॉकडाऊनमुळे मागील सुमारे दीड वर्षांपासून सहकारी संस्थांच्या निवडणूका स्थगित करण्यात आल्या होत्या. राज्य सरकारने या निवडणुकांवरील स्थगिती उठवत मागील १ सप्टेंबरपासून या संस्थांच्या टप्प्याटप्याने निवडणुका घेण्याचा आदेश दिला होता. या आदेशानुसार राज्य सहकार प्राधिकरणाने ३१ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील एकूण ४५ हजार ४०९ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा ६ टप्प्यांत समावेश केला आहे. याबाबतचा टप्पानिहाय ‘जिल्हा निवडणूक आराखडा’ तयार केलेला आहे.

सहकारी संस्थांच्या निवडणूका
महासर्वेक्षण: जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? काय म्हणतो सर्व्हे?

प्राधिकरणाने सप्टेंबरपासून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील अनुक्रमे ४ हजार ३६२ आणि १२ हजार ७२९ अशा एकूण १७ हजार ९१ सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया याआधीच सुरु केलेली आहे. राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी आतापर्यंत १६ बँकाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नाशिक, नागपूर, सोलापूर, बुलडाणा आणि उस्मानाबाद या पाच जिल्हा बॅंकाची निवडणूक निवडणूक प्रक्रिया जैसे थे ठेवत, राज्य सरकारने पुढे ढकलली आहे. रायगड व जालना या दोन बॅंकांची निवडणूक प्रक्रिया अद्याप सुरू केलेली नाही. गोंदीया, भंडारा, चंद्रपूर या तीन बँकांच्या निवडणुकीची बाब मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. तर वर्धा बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याशिवाय पुणे, मुंबई, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या चार जिल्हा बँकांच्या निवडणुकीची बाब न्यायप्रविष्ट असल्याने, या बॅंकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे बाकी आहे.

निवडणूक जाहीर झालेल्या सहकारी संस्थांची वर्गवारी

- निवडणूक जाहीर झालेल्या एकूण संस्था --- २७ हजार १३८

- एकूणपैकी कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय संस्था --- १८ हजार ३१०

- अन्य सहकारी संस्था --- ८ हजार ८२८

- अन्य संस्थांमध्ये साखर कारखाने, इतर पतसंस्था, नागरी सहकारी बँका, सहकारी सूतगिरण्या, सहकारी दुग्ध संस्थांचा समावेश

सहकारी संस्थांच्या निवडणूका
दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

मार्च २०२२ अखेर प्रक्रिया पूर्ण करणार

राज्यातील या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी अन्य सरकारी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचीदेखील नियुक्ती करण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. या संस्थांच्या निवडणूका मुदतीत पार पाडण्याच्यादृष्टीने निवडणुकीस पात्र संस्थांनी प्रारूप मतदार यादी व आवश्यक निवडणूक निधी संबंधित जिल्हा, तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. ही सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील वर्षी ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com