गर्भवतींसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणारे दीपक मानकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
कोथरूडमध्ये बहुतांशी प्रमाणातील नागरिक हे झोपडपट्ट्यांत राहातात. मुळात, अशाच भागात कोरोना पसरण्याची भीती आहे. त्यामुळे सर्वच पातळ्यांवर वस्त्या आणि झोपडपट्ट्या सुरक्षित ठेवण्याचा मानकर यांचा प्रयत्न आहे. त्यातून या भागांतील रहिवाशांना रोजच्या गरजा पुरविण्यासोबतच त्यांच्या आरोग्याला तेवढेच प्राधान्य देण्याची भूमिका मानकर यांची आहे.

कोरोनासोबत जगायचे आहे...मग त्यावर आता चिंता करीत बसण्यापेक्षा किंवा तात्पुरत्या उपायांचा मार्ग शोधण्यापेक्षा नगरसेवक दीपक मानकर यांनी ‘कोरोना फ्री-हॉस्पिटल’ची संकल्पना पुढे आणली आहे. विशेषत: झोपडपट्ट्यांमधील महिलांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल उभारून गर्भवती महिलांसाठी प्राधान्याने सुविधा देण्यात येणार आहेत. त्यांच्यावर रुटीन उपचारांसह तपासण्या, प्रसूतीची सोय असेल; तर गर्भवतींना गरजेनुसार तेही सहजरीत्या हॉस्पिटलमध्ये ये-जा करता येईल, याकरिता स्वतंत्र रुग्णवाहिकाही राहणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या साथीत महापालिकेच्या प्रसूतिगृहांमधील सेवांकडे काणाडोळा झाल्याने उपचारासाठी जाणाऱ्या गर्भवतींची गैरसोय होत आहे. डॉक्‍टर, स्त्रीरोग तज्ज्ञांपासून अन्य यंत्रणाही तोकडी पडत आहे. आर्थिक स्थिती नसल्याने दीड हजारांहून अधिक गर्भवती महापालिकेच्या प्रसूतिगृहात येतात; परंतु कोरोनाचा संसर्ग वाढल्याने गर्भवती प्रसूतिगृहांत येण्यास घाबरत आहेत. त्याचे परिणाम दिसून येत असल्याने या महिलांसह त्यांच्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी मानकर यांनी पावले उचचली आहेत. महापालिकेच्या एका मोकळ्या इमारतीत विशेषत: तळमजल्यावर ओपीडीसह (बाह्यरुग्ण विभाग) प्रसूतिगृह तयार केले जाणार आहे. त्या ठिकाणी खासगी डॉक्‍टर, पारिचारिका आणि कर्मचारी उपलब्ध होणार आहेत.

Image may contain: 1 person, standing, text that says "लॉकडाउनच्या काळात प्रभागातील नागरिकांना रेशन वेळेवर मिळावे, यासाठी दीपक मानकर स्वतः रेशन दुकानदारांशी संपर्क साधत होते."

गर्भवतींसाठी खास रुग्णवाहिका
पुणे शहरात सध्या रुग्णवाहिकांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे वस्त्या-झोपडपट्ट्यांमधील गरजू रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नाही. त्यामुळे ऐन प्रसूतिदरम्यान महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांपुढे अडचणी उभ्या ठाकत असल्याचे चित्र आहे. त्यावर उपाय म्हणून खास गर्भवतींसाठी रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहेत.

‘नायडू’त वाचनालयाची उभारणी
नवी आरोग्य व्यवस्था उभारताना डॉक्‍टर आणि अन्य बाबींचा महापालिकेवर ताण येऊ नये, याचीही काळजी मानकर यांनी घेतली. नव्या संकल्पनेसाठी सेवानिवृत्त डॉक्‍टर, पारिचारिकांसह खासगी महिला डॉक्‍टरही नेमण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे. त्याचवेळी महापालिकेच्या डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांसाठी मानकर यांनी छोटेखानी वाचनालय सुरू केले आहे. त्यातून सुमारे पाचशेहून अधिक पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे सलग आठ-दहा दिवस उपचार घेणाऱ्या रुग्णांना वाचनाची संधी मिळाली आहे.

पुणे शहरात आरोग्य व्यवस्थेची व्याप्ती वाढविण्याचा धडाच कोरोनाने यंत्रणेला दिला आहे. त्यातून गरजू घटकांसाठी छोटेखानी हॉस्पिटल उभारण्याची गरज दिसून येत आहे. त्याचा भाग म्हणून प्रभागाच्या पातळीवर ‘ओपीडी’ आणि प्रसूतिगृह असेल. ज्या ठिकाणी कोरोनाऐवजी अन्य आजारांच्या उपचाराची सोय राहणार आहे. 
- दीपक मानकर, नगरसेवक, पुणे महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune corona warriors corporator deepak mankar work