कोंढव्याला सुरक्षित ठेवणाऱ्या हसिना इनामदार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

...आणि कोरोना हरला!
कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला तेव्हा लोक घराबाहेर पाय ठेवायलाही तयार नसायचे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांत प्रचंड भीती होती. खासगी डॉक्‍टरही रुग्णांवर उपचार करीत नव्हते. तेव्हा हसीना मोठ्या धैर्याने कोरोनाविरोधात काम करीत राहिल्या. वरवरचे उपाय करण्याऐवजी परिणामकारक उपाय करण्यावर त्यांचा भर राहिला. त्यामुळे कोंढवा आणि परिसरात कोरोनाची थोडी का होईना; पण पीछेहाट झाली.

एका रिक्षाचालकाच्या गरजू कुटुंबाला मदत करीत कोंढव्यातील हसीना इनामदार यांनी माणुसकीचा पदर उलगडला. विशेष म्हणजे, हसीना इनामदार यांचा अपघात होऊनही त्या आणि त्यांची टीम लोकांसाठी रस्त्यावर उतरून काम करीत आहे. एक-दोन दिवस नव्हे, तर सलग तीन महिने त्या कोरोनाविरोधातील लढाईत सक्रिय आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनानं रिक्षाचालकाचा जीव गेला आणि खासगी हॉस्पिटलमधील त्याच्या उपचाराचा खर्च लाख-सव्वा लाखात आला. आधीच दोन-अडीच महिने कामधंदा नसलेल्या रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांना एवढं बिल भरणं शक्‍य नव्हतं. तिकडं बिलाचे पैसे भरल्याशिवाय डॉक्‍टर मृतदेह देत नव्हते. अंत्यसंस्कारासाठी लोक स्मशानभूमीत ताटकळले होते. हा प्रकार कोंढव्यातील हसीना इनामदार यांच्या कानावर आला आणि पुढच्या तासाभरात मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात आला. त्यावर अंत्यसंस्कार झाले, ते केवळ हसीना यांच्यामुळेच.

Image may contain: one or more people, people standing and outdoor, text that says "डॉक्टरांच्या पथकासह हसीना इनामदार."

कोंढव्यात कोरोनाचा उद्रेक होईल, अशी भीती असताना हसीना यांनी लोकांच्या रोजच्या जेवणाबरोबरच औषधोपचाराची सोय केली. या भागात खबरदारीच्या उपाययोजना राबवीत हसीना यांनी महापालिका आणि पोलिस यंत्रणांना एकत्र आणत खासगी डॉक्‍टरांची फौज वस्त्यांमध्ये उतरविली. ज्यामुळे कोरोना रुग्णांचा शोध घेणे सोपे झाले. या मोहिमेत स्वत: डॉक्‍टरांसोबत जाऊन त्यांनी महिलांची तापसणी केली.

त्याचवेळी लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यापासून पाचव्या टप्प्यापर्यंत म्हणजे आजही त्या रोज दीड हजार लोकांच्या जेवणाची सोय करीत आहेत. रोजाच्या महिन्यात मुस्लिम बांधवांना फळांपासून जीवनावश्‍यक वस्तू त्यांनी घरपोच पोचवल्या. त्यामुळे ही मंडळी खरेदीसाठी घराबाहेर आली नाही. रमजान ईदच्या आदल्या दिवशी शेकडो लिटर दूध मोफत देत त्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. ज्यामुळे गरजू कुटुंबीयांना योग्य वेळी योग्य मदत मिळाली. लॉकडाउनमध्ये सवलती जाहीर झाल्यानंतर सोसायट्या, रस्ते, चौक आणि उद्योगांमधील कामगारांपासून उद्योग व्यवस्थापनासाठी हजारो लिटर सॅनिटायझर उपलब्ध करून दिले. हसीना यांनी केलेल्या उपायांमुळे कोंढवा आणि परिसरात कोरोनाला आपली ताकद वाढविता आली नाही.

कोंढव्यातील लोकांत भीती पसरणार नाही, याची काळजी घेत मी स्वत: त्यांच्याशी बोलत राहिले. नेमक्‍या उपायांवर काम करून ते अमलात आल्यानेच आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून कोंढवा सुरक्षित राहिला. यापुढेही सतर्क राहू; ज्यामुळे कोरोनाचा पराभव होईल.
- हसीना इनामदार, सदस्य, वानवडी क्षेत्रीय कार्यालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune corona warriors corporator haseena inamdar