#PuneCrime घरफोडीचे २७ गुन्हे उघडकीस

Pune-Crime
Pune-Crime

पुणे  - शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोड्या करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्यांनी घरफोडीचे २७ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याकडून ४७ तोळे सोने, चांदीचे चार किलो वजनाचे दागिने, कार, दुचाकी असा २७ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

जितसिंग ऊर्फ जितू राजपालसिंग टाक (वय २३, रा. वैदूवाडी, हडपसर), हुकूमसिंग रामसिंग कल्याणी (वय २८, रा. हडपसर), अंगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (वय ३४, रा. रामटेकडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चनसिंग यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

या वेळी सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार उपस्थित होते. घरफोडी व चोरीच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर युनिट तीनच्या पथकाकडून झाडाझडतीचे काम सुरू होते. त्या वेळी घरफोडी प्रकरणामध्ये जितसिंग, हुकूमसिंग व अंगतसिंग यांचा सहभाग असल्याची खबर पोलिस कर्मचारी संतोष क्षीरसागर व अतुल साठे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, राजकुमार केंद्रे, प्रवीण तापकीर आदींच्या पथकाने त्यांना सापळा रचून पकडले. 

दरम्यान, संबंधितांची चौकशी केल्यानंतर त्यांनी मागील दीड वर्षापासून शहरात २७ घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. जितसिंग हा त्यांच्या टोळीचा म्होरक्‍या असून, त्याच्याविरुद्ध हडपसर, डेक्कन पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत, तर हुकूमसिंगविरुद्ध घरफोडी, चोरी व खुनाचा प्रयत्न असे गुन्हे आहेत. त्यांचा साथीदार लखनसिंग दुधाणी हा फरार असून, त्याच्याविरुद्धही नऊ गुन्हे दाखल आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com