
Pune Crime : सोन्याच्या दागिन्यासाठी वृद्ध महिलेचा खून करून फरारी झालेल्या आरोपीला अटक
मंचर : अंगावर असलेले सोन्याचे दागिने चोरून नेत असताना विरोध करणाऱ्या मंचर (ता.आंबेगाव) येथील अंजनाबाई प्रभाकर बाणखेले (वय ७८) या महिलेचा खून करणाऱ्या आरोपीला मंचर पोलिसांनी बारा तासात जेरबंद केले आहे.
गजानन बुद्धजन बांगर (वय ३१ रा.काकनवाडा ता.संग्रामपुर जि.बुलढाणा) असे आरोपीचे नाव असून घोडेगाव न्यायालयाने आरोपीला बुधवार (ता.१७) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सोमवारी (ता.८) दुपारपासून अंजनाबाई बेपत्ता झाल्या होत्या.त्या बेपत्ता असल्याची फिर्याद मंचर पाणीपुरवठा योजना समितीचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले यांनी मंचर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
मंगळवारी (ता.९) राहत्या घरापासून जवळच गवतामध्ये अंजनाबाई यांचा मृतदेह मिळाला. पोलीस तपासात त्यांचा खून सोन्याच्यादागिन्याच्या उद्देशानेझाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे मंचर शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान परिचयाच्या असलेल्या गजानन बांगर या कामगारांनेच हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.
त्यानुसार आरोपीला पकडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक मितेष गट्टे, खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गर्शनाखाली मंचर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतिश होडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार राजेंद्र हिले,
राजेश नलावडे, सोमनाथ वाफगावकर, संजय नाडेकर, अजित पवार, आविनाश दळवी हे पथक सुरतच्या दिशेनेरवाना झाले होते. आरोपी बांगर ला पोलिसांनी गोड बोलून व शिताफीने ताब्यात घेतले. सोन्याचे दागिने आरोपीने कोणाला दिले ? अजून या कटात कोणी सहभागी आहे का ? याचा शोध मंचर पोलीस घेत आहेत. अशी माहिती तपासाधिकारी पोलीस निरीक्षक सतीश होडघर यांनी दिली.