
Pune Crime : निगडे गावठी दारू साठा प्रकरणी केवळ एका आरोपीवर कारवाई ; ज्यांनी तक्रार केली त्यांना 'पाहून घेण्याची भाषा
Pune Crime : खडकवासला धरणाच्या पाण्याला लागून निगडे (ता. वेल्हे) गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात आढळलेल्या कच्च्या गावठी दारुच्या साठ्या संदर्भात वेल्हे पोलीसांनी केवळ एका आरोपीवर कारवाई केली व काही दिवसांपूर्वी त्या आरोपीला जामीणही मंजूर झाला आहे.
धक्कादायक म्हणजे संबंधित ठिकाणी पुन्हा गावठी दारुची भट्टी सुरू करण्यात आली होती जी पोलीसांनी नष्ट केली. मात्र पुणे-पानशेत रस्त्याला लागून असलेल्या गावांमध्ये गावठी दारू विक्री सुरू असून हे अवैध व्यावसायिक,' ज्यांनी ही माहिती पत्रकारांना व पोलीसांना दिली त्यांना पाहून घेऊ' अशी माहिती पसरवून दहशत निर्माण करत असताना पोलीसांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.
30 मार्च 2023 रोजी पुणे-पानशेत रस्त्याला लागून निगडे गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाण्याजवळ तब्बल आठ हजार लिटर कच्च्या गावठी दारुचा साठा आढळून आला होता. वेल्हे पोलीसांनी सदर ठिकाणी जेसीबी मशीनने कारवाई करत जमीनीत पुरलेले पिंप फोडून दारु साठा नष्ट केला.
एवढ्या मोठ्या प्रमाणात दारु साठा सापडूनही वेल्हे पोलीसांनी केवळ एका आरोपीवर कारवाई केली. अवघ्या काहीच दिवसात त्याला जामीनही मंजूर झाला. सदर ठिकाणी पुन्हा गावठी दारुची भट्टी सुरू करण्यात आली होती ती पोलीसांनी नष्ट केली मात्र इतर कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.
आम्ही पोलीसांना हप्ता देतो !........ आमच्या धंद्याची पोलीसांना सर्व माहिती असते. आम्ही मोठ्या प्रमाणात पोलीसांना हप्ता देतो म्हणून तर हे चालतंय. आज ना उद्या आमची माहिती पत्रकारांना कोणी दिली ते कळेल तेव्हा त्या माहिती देणारांना आणि त्या पत्रकारांनाही आम्ही पाहून घेऊ अशी धमकी इतरांमार्फत पसरवून जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न परिसरातील गावांतील अवैध दारू विक्रेते करत आहेत.
पोलीसांवर कोणतीही कारवाई नाही...
एवढ्या मोठ्या प्रमाणात गावठी दारुचा साठा आढळून आलेला असताना संबंधित पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी यांच्यावर वरिष्ठांनी कोणतीही कारवाई केलेली नाही किंवा साधी चौकशीही झालेली नाही.
परिणामी 'माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे तोपर्यंत तरी धंदे बंद ठेवा' अन्यथा कारवाई करु असा 'सल्ला' पोलीसच अवैध व्यावसायिकांना देत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान पोलीसांची साथ मिळत असल्यानेच अवैध दारू भट्टीची माहिती देणारे व त्याबाबत बातमी देणारे यांना पाहून घेऊ अशी दहशत पसरविण्याचे धाडस हे अवैध दारू विक्रेते व भट्टी चालविणाऱ्यांमध्ये निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
"एका आरोपीवर कारवाई करण्यात आली असून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा प्रस्तावही तहसीलदारांना पाठविण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी पुन्हा दारु भट्टी सुरू करण्यात आली होती ती नष्ट करण्यात आली आहे.
संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचा याबाबत खुलासा घेण्यात आला आहे मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. जर यापुढे असे प्रकार आढळून आल्यास संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल." भाऊसाहेब ढोले, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी, पुणे ग्रामीण.