
पुणे शहरातील एका बिल्डरसह राजकीय पक्षांच्या नेत्यांना खंडणी मागणाऱ्यास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केली अटक.
Pune Crime : राजकीय नेत्यांना खंडणी मागणाऱ्यास अटक
पुणे - शहरातील एका बिल्डरसह राजकीय पक्षांच्या नेत्यांना खंडणी मागणाऱ्यास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपीने भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक वसंत मोरे यांचा मुलगा रूपेश वसंत मोरे, माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह एका बिल्डरकडे प्रत्येकी ३० लाख रुपये खंडणीची मागणी केली होती.
आरोपीने केवळ एका तरुणीच्या कुटुंबीयांची बदनामी करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला. आरोपीकडे राजकीय नेत्यांचे फोटो, बनावट मॅरेज सर्टिफिकेट्स आणि ओटीपी स्क्रीन शॉट मिळाले आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे आणि पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
शाहनवाझ गाझीयाखान (वय ३१, रा. कोंढवा बुद्रूक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पुणे मॅरेज ब्युरो हा ग्रुप २०२० पासून सुरू असून, इम्रान समीर शेख (वय ३७, रा. घोरपडीगाव) हा ग्रुपचा अॅडमिन होता. एका महिलेने तिच्या मुलीचा बायोडाटा पुणे मॅरेज ब्युरो ग्रुपमध्ये टाकला होता. इम्रान याने त्या मुलीसाठी शाहनवाझ गाझीयाखानचे स्थळ सुचविले होते. परंतु तरूणीच्या कुटुंबीयांनी शाहनवाजचे स्थळ नाकारले. त्यानंतर इम्रान याने बनावट नावाने तरुणीच्या आईसोबत व्हॉट्सअॅप चॅटिंग करून तिचे लग्न स्वतःशी लावून देण्याची मागणी केली. परंतु त्याला नकार दिल्यानंतर इम्रानने ती तरूणी घटस्फोटित असल्याचा बनावट बायोडाटा तयार करून बदनामी केली. याप्रकरणी इम्रानला मार्च २०२२ मध्ये चंदननगर पोलिसांनी अटक केली होती.
या घटनेनंतर इम्रानने २३ सप्टेंबर २०२२ रोजी माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांना व्हॉट्सअॅप क्रमांकावरून खंडणी मागितली. या गुन्ह्यात इम्रानला अटक केली होती. त्यानंतर इम्रानने या तरूणीच्या नावाने फेसबुकवर अकाऊंट तयार केले. त्यावर त्याने तरुणीचे अश्लील फोटो मॉर्फ करून प्रसारित केले होते. या गुन्ह्यातही त्याला अटक झाली होती.
काही महिन्यानंतर इम्रानचा मित्र आरोपी शाहनवाझ गाझीयाखान याने राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमकी देणे सुरू केले. खंडणीची रक्कम खराडी परिसरातील आयटी पार्कसमोरील एका गाडीत ठेवण्यास सांगितली होती.
राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमक्यांमुळे चिंतेचे वातावरण पसरले होते. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेने पाच पथके तयार केली होती. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- २ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.