
Pune Crime : ‘त्या’ तोतया पत्रकारांनी बिल्डरकडे मागितली दोन फ्लॅटसह ५० लाखांची खंडणी
पुणे : पुण्यातील एका आयटी व्यावसायिकाकडे पाच कोटींची खंडणी मागणाऱ्या सोलापूरच्या दोन तोतया पत्रकारांनी अन्य एका बिल्डरकडे दोन फ्लॅट आणि ५० लाख रूपये खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत संबंधित बिल्डरने गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली असून, गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे.
पुण्यातील सॉफ्टवेअर कंपनीचे मालक संतोष पोपट थोरात (रा. अल्कॉन सोसायटी, खराडी) यांच्याकडे तोतया पत्रकारांनी पाच कोटी रूपयांची खंडणी मागितली होती. गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक या दोघांना पकडण्यासाठी गुरुवारी पाटस टोलनाक्याजवळ गेले होते. त्यावेळी आरोपींनी पोलिसांसोबत धक्काबुक्की करून अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत आरोपींच्या गाडीच्या टायरवर दोन राउंड फायर केले.
त्यामुळे गाडीचे टायर फुटले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महेश सौदागर हनमे (वय ४७) आणि दिनेश सौदागर हनमे (वय ४४, दोघे रा. राजेश्वरी नगर, बाळे, उत्तर सोलापूर) यांना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध चंदननगर आणि यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या दोघांना शिवाजीनगर येथील न्यायालयात शुक्रवारी हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २३ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्यातील भोसरीमधील एका बिल्डरची सोलापूर येथे कन्स्ट्रक्शन साइट सुरू आहे. आरोपींनी त्या बिल्डरकडेही ५० लाख रूपये आणि दोन फ्लॅटच्या खंडणीची मागणी केली होती. याबाबत संबंधित बिल्डरने गुन्हे शाखेकडे तक्रार दिली आहे. याबाबत तपास करण्यात येत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिली.
पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-२ चे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव यांच्या पथकाने आरोपींना अटक केली. दरम्यान, आरोपींनी अशा प्रकारे लोकांकडून खंडणी उकळल्याची शक्यता असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.