
Pune Crime : अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; तिघांविरुध्द गुन्हा दाखल, एकाला अटक
पुणे - एका अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीने हा प्रकार शिक्षकांना सांगितल्यानंतर उघडकीस आला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
या संदर्भात एका १६ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. त्यावरून कोंढवा पोलिस ठाण्यात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (पॉस्को) कायद्यांतर्गत तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१८ ते २०१९ दरम्यान घडला. मुन्ना मेहबूब नदाफ (वय २६, रा. येवलेवाडी- पुणे, मूळ रा. अमन चौक, सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
फिर्यादी अल्पवयीन मुलगी त्यावेळी इयत्ता सातवीत होती. ती घराशेजारी खेळत असताना एका घराच्या खिडकीतून खाली पडलेली वस्तू देण्यासाठी ती त्या घरात गेली. तेव्हा आरोपींनी तिला घरात ओढून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला. तसेच, कोणाला सांगितल्यास कुटुंबीयांना त्रास देण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलीने घाबरून हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला हा प्रकार शाळेतील शिक्षकास सांगितला. त्यावेळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. इतर दोन आरोपी फरारी असून, कोंढवा पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.