Pune Crime : हातभट्टीमुक्त गाव’ मोहिमेचा धडाका ! एकोणीस दिवसांत १८ लाखांची दारू जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hatbhatti-Daru

Pune Crime : हातभट्टीमुक्त गाव’ मोहिमेचा धडाका ! एकोणीस दिवसांत १८ लाखांची दारू जप्त

सोलापूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारूविरोधात मोहीम तीव्र केली असून मागील १९ दिवसांत जिल्ह्यात हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीचे ८७ गुन्हे नोंदविले आहेत. तब्बल १८ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल या कारवाईवेळी जप्त करण्यात आला आहे.

संपूर्ण राज्यभरात ‘हातभट्टीमुक्त गाव’ ही मोहीम राबविण्याचा संकल्प राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील हातभट्ट्यांची गावनिहाय (पोलिस ठाणेनिहाय) यादी तयार केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी हॉटस्पॉट ठिकाणांवर अचानक छापे टाकले जात आहेत.

हातभट्टी निर्माते, वाहतूकदार व विक्रेत्यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. चार दिवसांतील धाडीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३७ गुन्हे नोंदवत 35 संशयित आरोपींना अटक केली आहे. एक हजार ५७ लिटर हातभट्टी व १८ हजार ९५० लिटर गुळमिश्रित रसायन जप्त करुन नष्ट केले. माळशिरस पथकाने गुरुवारी सांगोला शहराच्या हद्दीत दोन ठिकाणाहून ८५ लिटर हातभट्टी दारु जप्त केली.

पंढरपूर पथकाने खर्डीतील आठवडी बाजारातून १५ लिटर तर करमाळा पथकाने कुर्डुवाडीतून १५ लिटर हातभट्टी दारुसह संशयितांना अटक केली. तसेच सीमा तपासणी नाका, नांदणीच्या पथकाने दोड्डी तांडा (अ) येथील हातभट्ट्यांवर छापे टाकून तीन हजार लिटर गुळमिश्रित रसायन जप्त करून जागेवरच नष्ट केले. शुक्रवारी (ता. १९) अकलूजच्या पथकाने फोंडशिरस येथून शिवाजी श्रीरंग माने या व्यक्तीच्या ताब्यातून २५ लिटर हातभट्टी दारु व साडेचार लिटर देशी दारु जप्त केली.ही कामगिरी ‘या’ पथकाने केली.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक माळशिरस संदीप कदम, निरिक्षक पंढरपूर पवन मुळे, दुय्यम निरिक्षक कैलास छत्रे, शंकर पाटील, राजेंद्र वाकडे, मानसी वाघ, सचिन गुठे, सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, जीवन मुंढे, जवान योगीराज तोग्गी, वसंत राठोड, तानाजी जाधव, तानाजी काळे, गणेश रोडे, विकास वडमिले यांच्या पथकाने पार पाडली.