विवाहितेचा अघोरी छळ! मृत माणसाच्या हाडाची राख पाण्यातून दिली पिण्यास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

married woman harassment

अमावस्येच्या दिवशी या महिलेला मृत माणसाच्या हाडाची राख पाण्यातून पिण्यास दिल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.

Pune Crime : विवाहितेचा अघोरी छळ! मृत माणसाच्या हाडाची राख पाण्यातून दिली पिण्यास

पुणे - एका उच्चशिक्षित विवाहित महिलेला मूलबाळ होत नसल्यामुळे सासरच्या लोकांनी मांत्रिकामार्फत अघोरी पूजा करवून घेतली. अमावस्येच्या दिवशी या महिलेला मृत माणसाच्या हाडाची राख पाण्यातून पिण्यास दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर दीर, जाऊ, पतीसह सासरची मंडळी पसार झाली असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

हा प्रकार धायरीतील विवाहितेच्या सासरी आणि निगडी येथे २७ एप्रिल २०१९ पासून सुरु होता. याप्रकरणी २८ वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरून सिंहगड रोड पोलिस ठाण्यात सातजणांवर विवाहितेचा छळ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही संगणक अभियंता असून, त्यांचा विवाह २७ एप्रिल २०१९ रोजी झाला. साखरपुड्याला सासरच्या ४५ महिलांना चांदीची जोडवी देण्यास भाग पाडले. तसेच, लग्नामध्ये ८० तोळे दागिने, साडेपाच लाखांची कार दिली. त्यानंतर जून २०२० मध्ये कार घेण्यासाठी १० लाख रुपये दिले. तसेच, विवाहितेच्या वडिलांनी जावयास सोन्याची चैन, ब्रेसलेट, अंगठ्या असे २५ ते ३० तोळे सोने आणि फिर्यादीला ५० तोळे सोने दिले. परंतु विवाहितेचा छळ सुरूच होता.

सासरची मंडळी आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी आणि विवाहितेला मूलबाळ व्हावे, यासाठी दर अमावस्येला तळघरातील खोलीत अघोरी पूजा करीत असत. त्यात टाचणी लावलेले लिंबू, काळ्या बाहुल्या, मिरची, हळदी कुंकू असायचे. फिर्यादीच्या जावेने एका महिलेला व्हॉटसअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल करून अघोरी पूजा करवून घेतली. अमावस्येच्या रात्री तिचे दीर, जाऊ, पतीसह सर्वजण स्मशानभूमीत गेले. तेथे जळालेल्या मृतदेहाची हाडे आणि राख गोळा करून घरी आणून त्याची पूजा केली. ती राख पाण्यामधून फिर्यादीला पिण्यास दिली. यानंतर पुन्हा ११ फेबुवारी २०२१ रोजी जावेच्या निगडी येथील घरी अघोरी पूजा केली.

फिर्यादीने हाडाची राख पिण्यास नकार दिल्यावर जावेच्या वडिलांनी रिव्हॉल्वरची धमकी देत ते पिण्यास भाग पाडले. कोकणात एका पूजेसाठी पाठवून तेथे मध्यरात्री धबधब्याखाली अंघोळ करायला लावली. विवाहितेने हा प्रकार पतीला सांगितला. परंतु पतीनेही हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुझ्या माहेरच्या लोकांचा मुडदा पाडू अशी धमकी दिली. आई-वडिलांनी पैसे देणे बंद केल्यानंतर विवाहितेला सासरच्या लोकांनी गेल्या २६ मे रोजी घरातून हाकलून दिले, अशी फिर्याद विवाहितेने पोलिस ठाण्यात दिली आहे.

याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात सासरच्या सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस निरीक्षकाच्या नेतृत्वाखाली पथक रवाना करण्यात आले आहे.

- सुनील पवार, सहायक पोलिस आयुक्त, सिंहगड रोड

टॅग्स :punecrimewomen harassment