
किरकटवाडी : खडकवासला व किरकटवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून बंद सदनिका व दुकाने फोडून वाढलेल्या चोरीच्या घटना अखेर थांबण्याची शक्यता निर्माण झाली असून पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा उलगडा केला आहे. खडकवासला परिसरात चोरी करणारी पुणे शहरातील एका अट्टल चोरट्याची टोळी असल्याची माहिती पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून मिळाली आहे.
पोलीस या टोळीच्या मुख्य सुत्रधाराच्या मागावर असून लवकरच त्याला त्याब्यात घेतले जाईल अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली आहे.
खडकवासला येथे दि 10 सप्टेंबर रोजी एकाच रात्रीत तीन ते चार दुकानांचे शटर उचकटून रोख रक्कम व मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. मागील पंधरा दिवसांत खडकवासला, कोल्हेवाडी व किरकटवाडी परिसरात बंद सदनिका व दुकाने फोडून चोरीच्या घटना वाढल्याने नागरिक व व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
चोरीच्या घटना रोखण्यात पोलीसांना अपयश येत असल्याबाबत 'सकाळ'ने लक्ष वेधल्यानंतर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलीसांना चोरांना पकडण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली खडकवासला परिसरात चोरी करणाऱ्या चोरांचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, पोलीस हवालदार राजू मोमिन,
अतुल डेरे, पोलीस नाईक अजित भुजबळ, अमोल शेडगे व पोलीस कॉन्स्टेबल मंगेश भगत यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत चोरांच्या टोळीतील एका अल्पवयीन गुन्हेगाराची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने खडकवासला येथील किराणा दुकान फोडून केलेल्या चोरीची कबुली दिली असून इतर सहकाऱ्यांसह अट्टल चोरटा असलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव सांगितले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांचा शोध घेत असून अल्पवयीन गुन्हेगाराला हवेली पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
"खडकवासला येथील चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीकडून टोळीच्या मुख्य सुत्रधारासह इतर साथीदारांची नावे मिळाली आहेत. लवकरच त्या अट्टल चोराला पकडण्यात येईल. या आरोपींनी इतर ठिकाणीही घरफोड्या केलेल्या असण्याची शक्यता असून पुढील तपासातून माहिती समोर येईल."
- अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण