
Viral Video : छोटा पॅकेट बडा धमाका; १० वर्षांच्या चिमुरडीने हाणून पाडला चेन चोरीचा प्रयत्न
पुण्यात एका १० वर्षांच्या मुलीने आपल्या आजीची सोन्याची चेन चोरी होण्यापासून वाचवली आहे. एका बाईकस्वाराने महिलेची चेन ओढण्याचा प्रयत्न केला, पण या १० वर्षांच्या मुलीने बाईकस्वाराशी लढून, त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पुण्यातल्या मॉडेल कॉलनी परिसरात २५ फेब्रुवारी रोजी घडली. ६० वर्षीय लता घाग या आपली १० वर्षीय नात रुत्वी घाग हिच्यासोबत घरी चालल्या होत्या. त्यावेळी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एक दुचाकीस्वार त्यांच्या जवळ आला.
त्यानंतर या व्यक्तीने लता घाग यांच्या गळ्यातली चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला. हे पाहून १० वर्षी रुत्वीने त्या व्यक्तीच्या तोंडावर बॅगने मारलं. त्यानंतर मात्र ही व्यक्ती तशीच पसार झाली. चेन चोरीचा प्रयत्न फसला. २५ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. जेव्हा या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला, तेव्हा हे समोर आलं.
त्यानंतर पुणे पोलिस पीडितांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी ९ मार्च रोजी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.