
Pune Crime News : इंस्टाग्रामवरील स्टेटसवरून मुलांच्या दोन गटांत मारहाण
पुणे : इंस्टाग्राम अकाउंटवर स्टेटस ठेवल्यावरून दोन अल्पवयीन मुलांच्या गटांमध्ये झालेल्या मारहाणीत चारजण जखमी झाले आहेत. उरुळी कांचनमधील एका जुनियर कॉलेजमध्ये बुधवारी (ता. २४) हा प्रकार घडला.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने त्याच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम या सोशल मीडियावर ‘एके आणि केके’ असे स्टेटस ठेवले होते. त्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून या तरुणाने आणि त्याच्या साथीदारांनी समोरच्या गटातील एका तरुणासह त्याच्या मित्राला हॉकी स्टिक आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
तर, त्याच्या विरोधात एका अल्पवयीन मुलाने तक्रार दिली आहे. या मुलाने स्टेटस ठेवण्याचे कारण सांगण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला आणि त्याच्या मित्राला तिघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यात दोघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.