
Pune crime news : बसस्थानकासमोर कटरने वार करून दोघा प्रवाशांना लुबाडले
पुणे : कटरने वार करून दोघा प्रवाशांना लुबाडण्यात आल्याची घटना वाकडेवाडी येथील शिवाजीनगर बसस्थानकासमोर घडली. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी योगेश बाबूराव जाधव (वय २७, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अरबाज जाफर शेख (वय २१, रा. खडकी) याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश हे २० फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास एसटी स्टॅंडमधून बाहेर येत होते.
त्यावेळी तिघा चोरट्यांनी फिर्यादीला धमकावून खिशातील तीनशे रुपये काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्यानंतर चोरट्याने योगेशच्या डाव्या गालावर कटरने वार करून जखमी केले.
तसेच, या घटनेच्या काही वेळापूर्वी अन्य एका तरुणाला चोरट्यांनी लुबाडले. याबाबत संकेत साईनाथ साबळे (वय २०, रा. मोकाटेनगर, कोथरूड) याने तक्रार दिली आहे. चोरट्यांनी संकेत साबळे यांचा पाठलाग करून जबरदस्तीने पैसे घेण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिकार केल्यानंतर चोरट्यांनी फिर्यादीच्या मानेवर कटरने वार करून जखमी केले.