
Wagholi Classmate Murder Case: विद्यार्थिनींवर खुनाचा गुन्हा दाखल; वाघोली वर्गमित्र खून प्रकरण
Wagholi Classmate Murder Case – वर्गमित्राचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी विद्यार्थिनींवर खुनाचा गुन्हा लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिसानी तिला अटक केली आहे. अशी माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिली.
येथील रायसोनी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या अनुजा पनाळे हिने आपला वर्ग मित्र असलेल्या यशवंत मुंढे याचा सोमवारी पहाटे त्याच्याच खाजगी वसतिगृहातील खोलीत चाकूने भोसकून खून केला. तिनेही स्वतः नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
यशवंत याचे पालक आल्यानंतर त्यांनी लोणीकंद पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर अनुजावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तिला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर पोलिसानी तिला अटक केली. पालकांनी यशवंतचा मृतदेह शवविच्छेदनानंतर लातूर येथे नेला. तिथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिने एवढी टोकाची भूमिका का घेतली याबाबत तपासात अधिक बाबी निष्पन्न होतील असे पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले.
अरे बापरे भयानक
ही घटना वाघोली व परिसरात कळताच शिक्षण क्षेत्रही हादरले. वाघोलीत अनेक अभियांत्रिकी व इतर महाविद्यालये आहेत. यामुळे शिक्षणासाठी मोठया प्रमाणावर मुले मुली येतात. अनेक पालकांनी ही घटना वाचल्यावर सोशल मीडियावर ' अरे बापरे भयानक 'अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
पालक वाघोलीत दाखल
ज्या खाजगी वसतिगृहातील इमारतीत ही घटना घडली. त्या खोलीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे व इमारतीत राहत असलेल्या इतर विद्यार्थ्यांचे जवळचे पालक सोमवारी काळजी पोटी वाघोलीत आले होते. ही घटना ऐकून ते ही हादरले होते.