
Pune Crime : महर्षीनगरमध्ये दोघांवर कोयत्याने वार
पुणे - जुन्या वादातून टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार केल्याची घटना गुरुवारी रात्री महर्षीनगर परिसरात घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंदार गायकवाड (वय ३५, रा. महर्षीनगर, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दादा मोरे, सार्थक शिंदे (दोघे रा. महर्षीनगर, गुलटेकडी), अनिकेत खाडे (रा. गुलटेकडी) आणि सिद्धार्थ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मंदार आणि त्याचे मित्र हे रात्री महर्षीनगर परिसरात थांबले होते. काही दिवसांपूर्वी आयपीएल क्रिकेट मॅच बघताना आरोपींचा मंदारसोबत वाद झाला होता. या जुन्या वादातून आरोपींनी मंदार याच्या हातावर कोयत्याने वार केला.
तसेच, भांडणात मध्यस्थी करणाऱ्या रोहन काकडे यालाही बांबूने मारहाण करून कोयत्याने वार केले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक उमेश कारके करत आहेत. दरम्यान, स्वारगेट परिसरातील महर्षीनगर, मुकुंदनगर भागात चोरी आणि मारहाणीच्या घटनांमुळे रात्री पोलिस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.