
पतीने धावत्या रेल्वेतून पत्नी आणि मुलीला ढकलून दिल्याची घटना खडकी रेल्वेस्थानक परिसरात घडली.
Pune Crime : धावत्या रेल्वेतून पत्नी, मुलीला ढकलले; मुलीचा मृत्यू, आरोपी पतीला अटक
पुणे - पतीने धावत्या रेल्वेतून पत्नी आणि मुलीला ढकलून दिल्याची घटना खडकी रेल्वेस्थानक परिसरात रविवारी (ता. १९) घडली. त्यात दोनवर्षीय बालिकेचा मृत्यू झाला असून, पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या संदर्भात लोहमार्ग पोलिसांनी पती आकाश भोसले याला अटक केली आहे. आर्या आकाश भोसले (रा. पद्मावती) असे मृत बालिकेचे नाव आहे. तिची आई वृषाली (वय २२) ही गंभीर जखमी झाली आहे. आकाश हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश याने पत्नी वृषालीला हाजी अली दर्ग्यात दर्शनासाठी जात असल्याचे सांगितले होते. तो पत्नी आणि मुलीला घेऊन रेल्वेने मुंबईला जात होता. खडकी रेल्वे स्थानक परिसरात आल्यानंतर त्याने पत्नीला दरवाजाजवळ बोलावून घेतले. आर्या वृषालीच्या कडेवरच होती. वृषाली बेसावध असतानाच आकाशने दोघी मायलेकींना जोरात धक्का मारून रेल्वेतून ढकलून दिले.
प्रवाशांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली. या घटनेत वृषाली आणि मुलगी आर्या या दोघी गंभीर जखमी झाल्या. पोलिसांनी दोघींना ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान आर्याचा मृत्यू झाला. आकाश एका खुनाच्या गुन्ह्यात सध्या जामिनावर बाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.