Pune Crime : एकाच कुटुंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न, पतीचा मृत्यू pune crime suicide attempt in family husband death | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

poison

Pune Crime : एकाच कुटुंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न, पतीचा मृत्यू

पुणे - एकाच कुटुंबातील पती-पत्नीसह मुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी हडपसर परिसरातील फुरसुंगी येथे घडली. या घटनेत पतीचा मृत्यू झाला असून, इतर दोघांवर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सूर्यप्रकाश हरिश्चंद्र आबनावे (वय ७२, रा. लक्ष्मी निवास, फुरसुंगी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर जनाबाई सूर्यप्रकाश आबनावे (वय ६०) आणि चेतन सूर्यप्रकाश आबनावे (वय ४१) यांच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आबनावे कुटुंबातील पती-पत्नी आणि मुलगा हे तिघेजण फुरसुंगी परिसरात राहतात. त्यांनी सोमवारी दुपारी घराचा दरवाजा आतून बंद करून विषारी औषध प्राशन केले. सोमवारी दुपारी नातेवाइकांनी आबनावे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणी फोन उचलत नसल्यामुळे नातेवाईक त्यांच्या घरी आले. तेव्हा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी ही बाब पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना रुग्णालयात दाखल केले. परंतु सूर्यप्रकाश आबनावे यांचा मृत्यू झाला.

सूर्यप्रकाश आबनावे हे छायाचित्रकार म्हणून नोकरीस होते. परंतु ते सध्या घरीच होते. त्यांची पत्नी जनाबाई कर्करोगाने आजारी असून, मुलाची नोकरी गेली आहे. त्यामुळे त्यांनी नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता नातेवाइकांनी व्यक्त केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोकुळे यांनी सांगितले.