#PuneCrime चोरट्यांपासून सावधान!

सचिन बडे
रविवार, 21 एप्रिल 2019

रेल्वे स्थानकावरील चोरट्यांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. गाड्यांची तपासणीही केली जाते. पकडलेल्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात येते.
- मनोज खंडाळे, पोलिस निरीक्षक, लोहमार्ग पोलिस

पुणे - तुम्ही पुणे रेल्वेस्थानकावर जाताय? तुमच्याकडे पैसे, मौल्यवान वस्तू आहेत? तर, मग जरा सावधच राहा. कारण, या परिसरात भुरट्या चोरांचा वावर वाढला आहे. गेल्या वर्षभरात येथे चोरीच्या शेकडो घटना घडल्या असून, ९२ चोरट्यांना गजाआड करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. तसेच, त्यांच्याकडून १८ लाख ३७ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

पुणे रेल्वेस्थानकावरून दररोज सुमारे तीन लाखांवर प्रवासी प्रवास करतात. त्यांच्यावर डोळा ठेवून भुरटे चोरटे स्थानकाच्या परिसरात फिरतात. या चोरट्यांनी शेकडो प्रवाशांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे लोहमार्ग पोलिसांच्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. त्यांच्याकडून वर्षात १८ लाख ३७ हजार ७१२ रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यामध्ये प्रवाशांची सोनसाखळी, मोबाईल फोन, पाकीट, पर्स आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. २०१८ मध्ये दाखल झालेल्या चोरीच्या घटनांपैकी ९२ चोरट्यांना पकडले आहे. मात्र, चोरट्यांवर वचक बसविण्यात पोलिसांना यश आले नसल्याचे कारवाईच्या टक्केवारीवरून दिसून येत आहे.

पुणे स्थानकावरील सुरक्षाव्यवस्था मजबूत नसल्याने हे स्थानक चोरांचे आगार बनले आहे. स्थानकावर चोरांचा खुला वावर असतो. पोलिसांचा धाक नसल्याने चोरीच्या घटना घडत आहेत.
- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

Web Title: Pune Crime Theft Alert Police