
Pune Theft : ‘माझी आई गावी गेली आहे. मला भूक लागली असून, जेवण द्या’, असे म्हणत चोरटयांनी...
पुणे - ‘माझी आई गावी गेली आहे. मला भूक लागली असून, जेवण द्या’, असे म्हणत चोरट्यांनी महिलेचे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि १५ हजारांची रोकड हिसकावून नेली. ही घटना १६ मे रोजी रात्री वडगाव शेरी येथील दिगंबर नगरमध्ये घडली.
या प्रकरणी एका ज्येष्ठ महिलेने (वय ७५, रा. वडगाव शेरी, पुणे) चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून चंदननगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीला १२ मे रोजी घरातील पेंटिंग आणि साफसफाईच्या कामासाठी बोलावले होते. त्याने त्यादिवशी काही काम केले. त्यानंतर उर्वरित साफ- सफाईच्या कामासाठी त्याला दुसऱ्या दिवशी बोलावले.
परंतु तो १६ मे रोजी ज्येष्ठ महिलेच्या घरी आला. त्याने ज्येष्ठ महिलेला ‘माझी आई गावी गेली आहे, मला भूक लागली असून, जेवण द्या, असे सांगितले. त्यावर जेवण देत असताना, आरोपीने इतर दोघांच्या मदतीने महिलेचे दागिने, मोबाईल आणि रोकड असा सुमारे ८३ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला.