
भावाला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्याच्या आदेशास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
Pune News : उषा काकडे यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्याच्या निर्णयास स्थगिती
पुणे - भावाला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्याच्या आदेशास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी सोमवारी (ता. 30) हा आदेश दिला. सत्र न्यायालयाने काही दिवसांपूर्वी उषा काकडे यांचे नाव या गुन्ह्यातून वगळण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणी उषा काकडे यांचे बंधू युवराज सीताराम ढमाले (वय ४०) यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार काकडे दाम्पत्याविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात काकडे दाम्पत्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर उषा काकडे यांनी गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला होता.
हा अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर उषा काकडे यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाने काकडे यांचा अर्ज मंजूर केला होता. त्यामुळे या आदेशाविरुद्ध फिर्यादी ढमाले यांनी त्यांच्या वकिलांमार्फत उच्च न्यायालयात अपील केले होते. फिर्यादीतर्फे ॲड. आबाद कोंडा, ॲड. सत्यव्रत जोशी, ॲड. निलेश त्रिभुवन आणि ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी कामकाज पाहिले.
उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत उषा काकडे यांचे नाव वगळण्याचा निर्णय स्थगित केला. तसेच काकडे यांना म्हणणे सादर करण्याबाबत नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान याबाबत काकडे दांपत्याची बाजू समजून घेण्यासाठी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
बाजू मांडण्याची संधी न देता अर्ज मंजूर केला -
फिर्यादी यांना नोटीस न बजावता, त्यांची बाजू मांडण्याची संधी न देता सत्र न्यायालयाने उषा काकडे यांचा अर्ज मंजूर केला होता. त्यामुळे नाव वगळण्याच्या निर्णयास स्थगिती द्यावी, असा युक्तिवाद करण्यात आल्याची माहिती ॲड. ठोंबरे यांनी दिली.