मास्क काढायला सांगितल्यानं तरुणाची हत्या! 15 दिवसानंतर उकललं गूढ : Pune Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Pune Crime: मास्क काढायला सांगितल्यानं तरुणाची हत्या! 15 दिवसानंतर उकललं गूढ

खेड-शिवापूर : तोंडावरचा मास्क काढायला सांगितल्यानं दोन जणांनी एका तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यात घडला आहे. हत्या करुन तरुणाचा मृतदेह वरंधा घाटात टाकून दिल्याचं तपासात उघड झालं आहे. सुमारे पंधरा दिवसांपासून हत्या झालेला तरुण बेपत्ता होता. पोलिसांनी अखेर संशयीत आरोपींना अखेर ताब्यात घेतलं आहे. (Pune Crime young man was killed after being asked to remove mask to accused)

पोलिसांच्या माहितीनुसार, दीपक धनाजी जगताप (वय 31, रा. रांजे, ता. भोर) आणि सागर नानासाहेब लिम्हण (वय 26, रा. पारवडी, ता. भोर) अशी आरोपींची नावं आहेत. या दोघांनी पंधरा दिवसांपूर्वी कुसगाव (ता.भोर) येथील अजय अंकुश मांजरे या तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह वरंधा घाटातील दरीत फेकून दिला होता. याप्रकरणी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तपास केला यामध्ये त्यांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृतदेहाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं आहे.

असा घडला घटनाक्रम

आरोपी 7 मे रोजी रांजे (ता.भोर) येथील एका हॉटेलात मास्क लावून बसले होते. यावेळी मांजरे यानं त्यांच्या चेहऱ्यावरील मास्क काढला, यामुळं दोघे आरोपी चिडले त्यामुळं त्यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपींनी मांजरे याच्यावर कोयत्यानं वार केलं. तो बेशुद्ध झाल्यावर त्याला चारचाकी वाहनातून वरंधा घाटात नेलं. त्याठिकाणी पुन्हा त्याच्यावर कोयत्यानं वार करून त्याला खोल दरीत फेकून दिलं. मृतदेहाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. मृतदेह नेलेली कार, तीन गावठी पिस्तूलं, आठ जिवंत काडतुसं आणि मृत व्यक्तीचा मोबाईल आरोपींकडून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, महादेव शेलार, राहुल गावडे, प्रदीप चौधरी, अभिजित सावंत, गणेश जगदाळे, मंगेश थिगळे, अमोल शेडगे आणि इतर यांच्या पथकानं ही कामगिरी केली.

टॅग्स :Pune NewsCrime News