
पुणे शहरात कोयता गँगने पुन्हा डोके वर काढले आहे. पर्वती गावात कोयता गँगने जुन्या भांडणातून एका तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले.
Pune Crime : कोयता गँगने पुन्हा डोके वर काढले; तरुणावर कोयत्याने वार
पुणे - शहरात कोयता गँगने पुन्हा डोके वर काढले आहे. पर्वती गावात कोयता गँगने जुन्या भांडणातून एका तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. येरवड्यातील मॉलमध्ये गुन्हेगारांनी कोयत्याने दहशत पसरवत दमदाटी केली. तसेच, अन्य एका घटनेत कोयत्याने तरुणाच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पर्वती गावात तरुणावर कोयत्याने वार -
हा प्रकार १८ मार्च रोजी दुपारी दीड वाजता पर्वती गावात बॅंकेजवळ घडला. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी नवनाथ वाडकर आणि शेखर वाघमारे (दोघे रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आयुष विठ्ठल चव्हाण (वय २१, रा. साईलीला सोसायटी, वाघोली) असे जखमीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथ याची आश्विन रेणुसे याच्याशी काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. आयुष हा त्याचे मित्र आश्विन आणि मुसा पटेल यांच्यासमवेत दुचाकीवरुन जात होता. पर्वती पायथा परिसरात आल्यानंतर आरोपींनी आयुष आणि त्याच्या मित्रांना अडवले. वाडकर याने आयुष याच्यावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली.
येरवड्यातील मॉलमध्ये कोयत्याची दहशत -
गुन्हा मागे न घेतल्याच्या कारणावरून सराईत गुन्हेगारांनी एका तरुणाला कोयत्याने धमकावले. तसेच, कॉफी शॉपच्या काउंटरवर कोयत्याने वार करून महिलेसह दोघांना दमदाटी केली. ही घटना येरवडा येथील ईशान्य मॉलमधील कॉफी शॉपमध्ये १८ मार्च रोजी सायंकाळी घडली. याबाबत रोहित राजेंद्र वाघमारे (वय २१, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याने फिर्याद दिली आहे. त्यावरून येरवडा पोलिसांनी सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. निखिल मधुकर कांबळे, हुसेन युनूस शेख, हर्ष जाधव, सिद्धार्थ भोला, साहिल पीटर कांबळे, सुदेश रूपेश गायकवाड आणि तुषार चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत.
कोयत्याने तरुणाच्या डोक्यात वार -
कबुतरे चोरल्याच्या वादातून तिघांनी एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केले. या हल्ल्यात साहिल सतीश गायकवाड (वय २२, रा. ओहाळ वस्ती, लोहगाव) हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना लोहगाव स्मशानभूमीजवळ १६ मार्च रोजी रात्री घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अक्षय सगळगिरे, अभी धिवार आणि अन्य एका तरुणाविरुद्ध (तिघे रा. लोहगाव) गुन्हा दाखल केला आहे.