
Pune Crime : टोळक्याने तरुणावर केले कोयत्याने वार; जीवे मारण्याचा प्रयत्न
धायरी : थांब तुला मारून टाकतो, असे मोठमोठ्याने म्हणत टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करुन परिसरात दहशत निर्माण केली. मित्राच्या भावाच्या लग्नाचा मांडव टहाळा कार्यक्रमात झालेली भांडणे सोडविल्याचा राग धरुन हा हल्ला केला असल्याचे कारण समोर आले आहे.
याबाबत सागर दिलीप लोखंडे (वय ३२, रा. कुष्णकुंज सोसायटी, नर्हे, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी करण जांभळे, गणेश खांडेकर, मोन्या सुर्वे, मयुर परब, अक्षय बारगजे व त्यांचे २ ते ३ साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नर्हे येथील जेएसपीएम रस्त्यावरील एका कॅफेसमोर बुधवारी रात्री पावणे अकरा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा मित्र ऋषिकेशच्या भावाचा लग्नाचा मांडव टहाळा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात ऋषिकेश याचे मोन्या सुर्वे यांच्याबरोबर भांडण झाले होते. ही भांडणे तक्रारदार यांनी सोडविली होती.
त्यानंतर बुधवारी रात्री तक्रारदार व त्यांचा मित्र ऋषिकेश हे जेवायला गेले होते. त्यावेळी मोन्या सुर्वे आपल्या साथीदारासह तेथे आला. त्याने तेथे दहशत निर्माण करुन थांब तुला मारुन टाकतो, असे मोठमोठ्याने ओरडून तक्रारदार यांच्या डोक्यास, हाताचे मनगटावर कोयत्याने वार करुन मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी जेवण करीत असलेल्या ठिकाणी दगडफेक केली. खुर्च्या मारुन तोडफोड केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव करीत आहेत