
पुणे जिल्हा परिषदेतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने आयोजित कऱण्यात आलेल्या दख्खन जत्रेला सोमवारी (ता.२०) काश्मीरमधील युवक-युवतींनी भेट दिली.
Dakkhan Jatra : काश्मिरी मुला-मुलींनी घेतला महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद
पुणे - पुणे विभागातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने आयोजित कऱण्यात आलेल्या दख्खन जत्रेला सोमवारी (ता.२०) काश्मीरमधील युवक-युवतींनी भेट दिली. यावेळी काश्मिरी युवक-युवतींनी या जत्रेतील महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ्यांचा मनमुराद आस्वाद घेतला. सोमवारी या जत्रेचा समारोप झाला. या जत्रेत महिला बचत गटांच्या उत्पादनांची गेल्या तीन दिवसात सुमारे ५० लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी (ता.२०) यांनी सांगितले.
राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत येत असलेल्या उमेद या उपक्रमांतर्गत महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विभागस्तरीय दख्खन जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही जत्रा १७ फेब्रुवारीला सुरु झाली होती. आज तिचा समारोप झाला. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यातील मिळून १५० स्टॉल लावण्यात आले होते.
काश्मिरी २३ मुला-मुलींनी प्रामुख्याने पुरणपोळी, मिरचीचा खर्डा, पिठलं भाकरी, वांग्याचे भरीत या मराठमोळ्या खाद्यपदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला. यामध्ये पुण्यात शिक्षण घेत असलेल्या काश्मिरी मुलांचा समावेश होता. त्यांनी महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांबरोबरच महाराष्ट्रीयन संस्कृती, कला, मनोरंजन यांचा आनंद घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपायुक्त (विकास) विजय मुळे, जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी धोटे-कडू आदी उपस्थित होते.