पुणे-दौंड "डीएमयू' अखेर मार्गस्थ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

कोल्हापूरहून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दाखविला हिरवा झेंडा; दुपारी 2.05 वाजता दौंडकडे रवाना

कोल्हापूरहून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दाखविला हिरवा झेंडा; दुपारी 2.05 वाजता दौंडकडे रवाना
पुणे - अनेक वर्षांच्या मागणीनंतर पुणे-दौंड मार्गावर नव्याने सुरू झालेल्या 14 डब्यांची "डिझेल मल्टिपल युनिट' (डीएमयू) आज दुपारी 2 वाजून 5 मिनिटांनी पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून रवाना झाली. तत्पूर्वी, कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमात "व्हिडिओ लिंकद्वारे' रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखवून या गाडीचे उद्‌घाटन केले.

पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म 1वर "डीएमयू'च्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम आयोजिला होता. या वेळी पुणे स्टेशनवरील मोफत "वाय-फाय' सुविधा, पुणे-मिरज-लोंढा मार्गाचे दुपदरीकरण, उड्डाण पुलाची पायाभरणी यांचेही "व्हिडिओ लिंकद्वारे' प्रभू यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. या प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, खासदार सुप्रिया सुळे, अनिल शिरोळे, अमर साबळे; तसेच रेल्वे विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी महापौर टिळक म्हणाल्या, 'दौंड आणि बारामती पुण्याला जोडण्यासाठी ही रेल्वेसेवा उपयुक्त ठरणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून शाश्‍वत विकास आणि पर्यावरण संवधर्नाचा विचार करत रेल्वेमध्ये बायो-टॉयलेटची सुविधा दिली आहे; तसेच सौरऊर्जेवर आधारित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही सुरू केला आहे.''

सुळे म्हणाल्या, 'गेल्या अनेक वर्षांपासून दौंड-बारामतीला विशेष रेल्वे सुरू करण्यासंदर्भात मी व्यक्तिशः प्रयत्न केले. प्रभू यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. पुणे आणि जिल्ह्याच्या विकासकामांसाठी दिल्लीमध्ये सर्व खासदार पक्षभेद विसरून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काम करत असतात. त्यामुळे आजपासून पुणे-दौंड-बारामतीमधील नागरिकांच्या सेवेसाठी डीएमयू सुरू झाली आहे.''
शिरोळे म्हणाले, ""दौंड आणि बारामतीच्या रहिवाशांना आता पुण्याला रेल्वेमुळे जोडले गेले आहे. ही विशेष रेल्वे सुरू करण्यासाठी सुळे यांच्यासमवेत मीही प्रयत्न केले. नोकरदार आणि व्यापारासाठी या रेल्वेमुळे मदत होणार आहे.''

श्रेयवादासाठी घोषणाबाजी !
पुणे-दौंड-बारामती "डीएमयू'ला उद्‌घाटनासाठी फुलांनी सजविले होते; तसेच 14 डब्यांवर "राष्ट्रवादी'ने शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रतिमा असलेले स्टिकर्स लावले होते. या वेळी राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. परिणामी, प्लॅटफॉर्म 1 वरील राजकीय वातावरण काहीकाळ तणावपूर्ण झाले होते.

श्रेयवादावरून स्टेजवर आलेल्या दोन्ही पक्षांच्या काही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची अन्‌ किरकोळ धक्काबुक्की झाली. या प्रसंगी पोलिस प्रशासन आणि सर्व खासदारांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. गोंधळ शांत झाल्यानंतर कार्यक्रम सुरळीत पार पडला.

Web Title: pune-daund dmu start