पुण्याचा विकास अडकला नकाशात

पुण्याचा विकास अडकला नकाशात

पुणे - विमानतळ आणि परिसरात बांधकामांना परवानगी देण्यासंदर्भात हवाईदलाने केलेल्या ‘कलर कोड झोनिंग मॅप’मध्ये (सीसीझेडएम) त्रुटी आहेत. त्यामुळे शहरातील हजारो बांधकामे अडकून पडली आहेत. त्याचा परिणाम पुणे महापालिकेच्या उत्पन्नावर झाला आहे; परंतु सत्ताधारी पक्षाच्या आमदार आणि खासदारांना याकडे लक्ष देण्यास वेळच नाही. त्यामुळे पुण्याचा विकास ठप्प झाला आहे.

विमानतळ परिसरात बांधकामांना काही अटी व शर्तीवर परवानगी द्यावी, असे नोटिफिकेशन हवाईदलाने २०१५ मध्ये काढले होते. यामध्ये बांधकाम परवानगी देण्यासाठीचे कलर कोड झोनिंग मॅप करावेत, ते मॅप कसे करावेत, याच्याही सूचना दिल्या होत्या. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे २०१८ मध्ये यासंदर्भात हवाईदलाने कलर कोड झोनिंग मॅप तयार करून महापालिकेला दिले. त्यामध्ये हवाईदलाच्या विमानतळाच्या हद्दीपासून चार किलोमीटरच्या परिसरात ‘रेड झोन’ दाखवून त्यामध्ये बांधकामांना परवानगी देताना लष्कराचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्याचे बंधन घातले. ‘पिंक झोन’मध्ये ६३७ मीटर उंचीपर्यंत वास्तुविशारदांनी दाखल केलेल्या प्लॅननुसार महापालिकेने प्रमाणपत्र द्यावे, असे परिपत्रक काढले. पिंक झोनमध्येच त्यापेक्षा जास्त उंचीच्या इमारतींना परवानगी देताना हे प्रमाणपत्र हवाईदलाकडून घेणे बंधनकारक केले.

वास्तविक, २०१५ चे नोटिफिकेशन आणि २०१८ मध्ये हवाई दलाने तयार केलेल्या कलर कोड झोनिंग मॅपमध्ये तफावत आहे. नोटीफिकेशननुसार मॅपमध्ये रेडझोन दर्शविला, तर त्याची हद्द चार किलोमीटरपेक्षा खूपच  कमी होते. 

मॅपमधील या त्रुटी लक्षात आल्यानंतर महापालिकेने राज्य आणि केंद्र सरकारच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देत दुरुस्तीची मागणी केली; तसेच हवाईदलाच्या कायद्यानुसार मॅपमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी हवाईदलाकडे अपीलही केले. मात्र, नकाशातील या दुरुस्ती करण्यासाठी सहा महिन्यांहून अधिक काळ झाला; परंतु सरकारला त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे ही त्रुटी दुरुस्ती होऊ शकलेली नाही. 

पालिकेच्या उत्पन्नाला फटका
पुणे शहरात एनडीए आणि लोहगाव विमानतळ हे दोन्ही हवाई दलाच्या मालकीची विमानतळ आहेत. या दोन्ही विमानतळांपासून चार किलोमीटर परिसरात ‘रेड झोन’ पडला आहे. हवाईदलाच्या चुकीमुळे शहराचा जवळपास ७० टक्के भाग ‘कलर कोड झोनिंग मॅप’मध्ये अडकला आहे. त्यातून महापालिकेच्या महसुलाला फटका बसत असूनही सत्ताधारी पक्षाला राजकारणापलीकडे या प्रश्‍नाकडे लक्ष देण्यास वेळ मिळालेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com