काश्‍मीरप्रश्‍न मुळाशी जाऊन हाताळावा

pune-dialogue-on-kashmir
pune-dialogue-on-kashmir

पुणे - काश्‍मीर प्रश्‍न हा केवळ त्या राज्याचा नसून, तो संपूर्ण देशापुढील महत्त्वाचा प्रश्‍न आहे. काश्‍मीरमधील समस्यांच्या मुळाशी जाऊन या प्रश्‍नाला हात घालायला हवा. काश्‍मिरी नागरिकांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होऊ न देण्याची काळजी घेतानाच, देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका पोचू न देणे, हा समतोल साधणे महत्त्वाचे आहे.

येत्या काळात लवकरात लवकर काश्‍मीरला देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचे प्रयत्नही होणे आवश्‍यक आहे, असा सूर ‘पुणे डायलॉग ऑन काश्‍मीर’ या चर्चासत्रात व्यक्त झाला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ‘यशवंतराव चव्हाण नॅशनल सेंटर ऑफ इंटरनॅशनल सिक्‍युरिटी ॲण्ड डिफेन्स ॲनालिसिस’ आणि ‘सेंटर फॉर ॲडव्हान्स स्ट्रॅटिजिक स्टडीज’ यांनी काश्‍मीरसंबंधी प्रश्‍नांविषयी विविध बाजूंनी मंथन घडवून आणण्याच्या उद्देशाने बुधवारी हे चर्चासत्र आयोजिले होते. यात एअर व्हाईस मार्शल कपिल काक (निवृत्त), ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, एम. के. मंगलमूर्ती, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), डॉ. विजय खरे तसेच विविध क्षेत्रांतील अभ्यासक, लष्करी अधिकारी, काश्‍मिरी विद्यार्थी व काश्‍मिरी प्रश्‍नांवर काम करणाऱ्या विविध समाजसेवी संस्था-संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
काक म्हणाले, ‘‘काश्‍मीर प्रश्‍न अल्पकालीन, मध्यमकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांच्या माध्यमातून हाताळला जायला हवा. शिवाय, राजकारण्यांसोबतच सिव्हील सोसायटी आणि विचारवंतांनीही आपला हातभार हा प्रश्‍न सोडविण्यासाठी लावायला हवा. काश्‍मिरमधील युवकांचा कौशल्यविकास घडवत तेथील अर्थव्यवस्था बळकट करायला हवी.’’

गाडे म्हणाले, ‘‘सीमा भागातील लोक जर स्वतःला असुरक्षित समजत असतील आणि त्यांना जर मुख्य प्रवाहापासून बाजूला सारले गेल्याच्या भावना जाणवत असेल, तर यामागील कारणांच्या मुळाशी जायला हवे. काश्‍मिरी लोकही भारतीयच आहेत, असा विश्‍वास त्यांच्या मनांत निर्माण करणे आवश्‍यक ठरेल.’’

काश्‍मीरबाबत विविध स्तरांत संवाद होणे आवश्‍यक आहे. तेथे शांतता आणि समृद्धी निर्माण करणे, हे आपले सगळ्यांचे कर्तव्य म्हणूनच आपण समजायला हवे. समाजात भाषा, प्रांत आणि धर्माच्या नावावर सर्वसामान्य लोकांना ओढणे सोपे असते. मात्र, त्यात हेच सर्वसामान्य भरडलेही जातात. राष्ट्रविरोधी शक्तींकडून काश्‍मीरमध्ये हेच घडवले जात आहे. ही परिस्थिती बदलायला हवी. आपण सर्वांनी एकत्र येत काश्‍मिरी लोकांच्या विकासात हातभार लावावा. काश्‍मीरमधील समस्यांवर मदत म्हणून तेथील शाळांसाठी संगणक आणि रुग्णालयांकरिता रुग्णवाहिकांची मदत ‘सकाळ’तर्फे देण्यात आली होती. याला तेथे सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. अशीच पावलं अनेकांनी एकत्र येत उचलली, तर त्यातून अनेक चांगल्या गोष्टी घडून येऊ शकतील.  
- प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ माध्यम समूह

चर्चासत्रातील महत्त्वाचे मुद्दे 
 काश्‍मिरी तरुणांना शिक्षण व हाताला काम आवश्‍यक
 राजकारणातून धर्म बाजूला सारावा
 मानवी हक्कांची पायमल्ली थांबावी
 उद्योगांनी काश्‍मिरात जावे
 बालवयातच दहशतवादाकडे ओढल्या जाणाऱ्या मुलांचा प्रश्‍न महत्त्वाचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com