Pune : पुण्याच्या आघारकर संस्थेने सिक्कीममध्ये शोधले डायटम्स; दुर्मिळ आजारांवर रामबाण उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune : पुण्याच्या आघारकर संस्थेने सिक्कीममध्ये शोधले डायटम्स; दुर्मिळ आजारांवर रामबाण उपाय

पुणे - पश्‍चिम घाटाप्रमाणेच देशाच्या ईशान्येकडील भागही जैवविविधतेने समृद्ध आहे. या भागात अजूनही न शोधल्या गेलेल्या सजीवांच्या कित्येक जाती प्रजाती आहेत. ईशान्येकडील सिक्कीम राज्यामध्ये हिमालयातील भागात नुकतीच डायटम्सच्या (करंडक किंवा एकपेशी वनस्पतीच्या) नव्या प्रजातीची नोंद करण्यात आली आहे.

विशेष म्हणजेच प्रथमच कड्यावरून या डायटम्सचा शोध लावण्यात आला असून, पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेच्या (एआरआय) शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला आहे. निसर्गातील विविध घटकांचा अभ्यासाद्वारे भविष्यात दुर्मिळ आजारांवरील औषधे तयार करण्यास मदत मिळणार आहे.

एआरआयच्या वतीने ‘जैवविविधता आणि त्याचा मानवी कल्याणासाठी उपयोग’ हे ध्येय ठेवून विविध प्रकारचे संशोधन कार्य केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशातील जैवविविधता हॉटस्पॉट्सच्या भागात असलेल्या डायटम्सच्या नोंदी व त्यांचा अभ्यास करण्यात येत आहे. याबाबत एआरआयचे शास्त्रज्ञ डॉ. कार्तिक बालासुब्रमण्यन यांनीपान सांगितले,

‘‘डायटम हे मुख्यतः समुद्र, दलदली, नद्या व तळे अशा ठिकाणी आढळतात. परंतु या अभ्यासादरम्यान प्रथमच आम्हाला कड्यांवर असलेल्या शेवाळामध्ये हे नव्या प्रजातीचे डायटम आढळले. जलचर अधिवासा व्यतिरिक्त ओल्या कड्यांवरच्या अधिवासात डायटम आढळल्याने त्यांच्याकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. या प्रजातीला ‘ॲडलाफिया कोसिओलेकी’ असे नाव देण्यात आले आहे.

प्रा. जे. पी. कोसिओलिक या अभ्यासकाचा सन्मान या नावातून केला जात आहे. आधुनिक संशोधन तसेच वैद्यकीय आदी क्षेत्रांसाठी या वनस्पतींचा सविस्तर अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, रस्त्याच्या बाजूला ओल्या कड्यांवर आढळणाऱ्या या प्रजातीला आसपासच्या दीर्घकाळ वाहतुकीमुळे वाहनांच्या उत्सर्जनाचा धोका निर्माण होऊ शकतो.’’

देशात चार प्रमुख जैवविविधता हॉटस्पॉट किंवा मर्मस्थळे आहेत, ज्यामध्ये एक पश्‍चिम घाट तर दुसरे ईशान्य भारतातील हिमालय पर्वत रांगा. केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाद्वारे सध्या ईशान्य भारतातील सर्व जैवविविधता घटकांचे दस्तावेज तयार करून त्यांचे संवर्धन करण्याचा प्रकल्‍प राबविण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने एआरआयचा सहभाग असून त्यामध्ये लायकन्स, मोलस्क (गोगलगायी, कालव यांसारखे) तसेच, डायटम्स यांच्या नोंदी करण्यात येत आहेत. या प्रकल्पांतर्गत ईशान्येकडील सिक्किम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा सारख्या राज्यांमधून मोठ्या संख्येने नमुने गोळा करण्यात आले आहेत. त्यामध्‍ये डायटम्सच्या विविध प्रजातींची नोंद व डेटा संकलित करण्यात येत आहे, असेही डॉ. कार्तिक यांनी नमूद केले.

महत्त्व काय आहे?

पृथ्‍वीवरील सुमारे २५ टक्के ऑक्सिजननिर्मितीत डायटम्सचा वाटा

सौंदर्यप्रसाधनांच्या क्षेत्रात डायटम्सचा वापर

डायटम्समध्ये अनेक रसायने आहेत जे विविध गोष्टींसाठी उपयुक्त ठरतात

या रसायनांचा अभ्यास करत काही दुर्मिळ आजारांच्या उपचारासाठीदेखील त्यांचा वापर केला जाऊ शकतो

पाण्याची गुणवत्ता व हवामान बदलामुळे जलचर परिसंस्थेवर होणारा परिणाम समजण्यासाठी ते उपयुक्‍त

काय आहे डायटम?

डायटम हे सूक्ष्म शेवाळातील प्रकार असून जलचर अन्न साखळीतील हे प्राथमिक व महत्त्वाचे घटक आहेत. हे एक पेशी सूक्ष्मजीव असल्याने त्यास उघड्या डोळ्यांनी पाहणे शक्य नाही. या डायटम्सची जलीय अधीवासामधली निरोगी वातावरण राखण्यामधली भूमिका समजून घेणे आवश्यक आहे.

जैवविविधतेच्या घटकांची माहिती संकलित करणारा हा अशा प्रकारचा पहिलाच अभ्यास आहे. या पूर्वी डायटम्सविषयीच्या माहितीचे अशा प्रकारे संकलन करण्यात आले नाही. त्यामुळे हा अभ्यास देशातील विविध भागातील डायटम्सची वर्गवारी करण्यासाठी पहिले पाऊल असून या डेटाच्या आधारे डायटम्समधील कोणते घटक महत्त्वाचे आहेत यावर संशोधन केले जाऊ शकते,

- डॉ. कार्तिक बालासुब्रमण्यन, शास्त्रज्ञ ‘एआरआय’

टॅग्स :Pune News