पुणे जिल्ह्यातील लसीकरणाला 58 टक्‍क्‍यांची मात्रा 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

जिल्ह्यात सरासरी 58 टक्के लाभार्थ्यांनी लशीची पहिली मात्रा घेतली. त्यातील पुणे शहरात 55 टक्के, पिंपरीचिंचवड शहरात 56 टक्के तर ग्रामीण भागात 61 टक्के लाभार्थ्यांचा समावेश आहे. 

पुणे - कोरोना लशीकरणाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात निश्‍चित केलेल्या 3 हजार 100लाभार्थ्यांपैकी एक हजार 802 लाभार्थ्यांनी शनिवारी प्रत्यक्ष लस घेतली. संध्याकाळी साडेपाच वाजता पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात सरासरी 58 टक्के लाभार्थ्यांनी लशीची पहिली मात्रा घेतली. त्यातील पुणे शहरात 55 टक्के, पिंपरीचिंचवड शहरात 56 टक्के तर ग्रामीण भागात 61 टक्के लाभार्थ्यांचा समावेश आहे. 

हे वाचा - CET सेलकडून विद्यार्थ्यांना दिलासा; जात, इडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यासाठी मुदतवाढ

जगातील सर्वांत मोठ्या कोरोना लसीकरणाला शनिवारी (ता.16) भारतात सुरवात झाली. कोरोना विरुद्धच्या लढाईचा ऐतिहासिक निर्णायक क्षण म्हणून या लसीकरणाकडे पाहिले जात आहे. सकाळी साडेदहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेबिनारच्या माध्यमातून नागरिकांसह देशभरातील लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना उद्देशून भाषण केले. त्यानंतर लसीकरणाला सुरवात झाली. कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यात 31 केंद्रांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी फक्त औंध येथील जिल्हा रुग्णालयात भारत बायोटेक निर्मित स्वदेशी "कोव्हॅक्‍सिन', तर उर्वरित सर्व केंद्रात "कोव्हिशिल्ड' लशीचा पहिली मात्रा देण्यात आली. विशेष म्हणजे यापैकी फक्त दोन लाभार्थ्यांना किरकोळ स्वरुपाचा त्रास जाणवला. संपूर्ण जिल्हाभरात फक्त सिंबायोसिस मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात 100 टक्के, तर सर्वांत कमी कान्हे फाटा येथील आरोग्य केंद्रात फक्त 33 टक्के लाभार्थ्यांनी लशीचा पहिली मात्रा घेतली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

पिंपरी चिंचवड शहरात 56 टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण 

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी 800 पैकी 456 लाभार्थ्यांनी लस घेतली. महापालिकेच्या आठ रुग्णालयात लशीकरणाची सोय केली आहे. ही लस आरोग्य सेवा देणाऱ्या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक रुग्णालयाबाहेर लस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी मोबाईल नंबरसहीत लावली होती. त्यानुसारच लशीकरण करण्यात येणार होते. परंतु ऐनवेळी काहीजण घाबरले असावेत, म्हणून निम्मेच लाभार्थी आले असावेत, असा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जिल्ह्यातील स्थिती आकड्यांमध्ये 
- ग्रामिण भागातील लसीकरण केंद्रे - 15 
- पुणे शहरातील केंद्रे - 8 
ृ- पिंपरीचिंचवड शहरातील केंद्रे - 8 
- एकूण लाभार्थी - 13 हजार 
- उपस्थित लाभार्थी - 1 हजार 802 
- लस घेण्यात नकार दिलेले - 41 
- किरकोळ त्रास झालेले लाभार्थी - 2 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune district 58 percent beneficiaries will get the first dose of vaccine