Pune: कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Counting of votes

Pune: कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

पुणे- कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या पोटनिवडणुकीसाठी येत्या रविवारी (ता.२६) सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

या निवडणुकीच्या मतदानासाठी आवश्‍यक मतदान यंत्रासह सर्व कर्मचारी शनिवारी (ता.२५) दुपारीच मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत.

पीएमपीएमएलच्या ४३ बसेस, सात मिनीबस आणि दहा जीपद्वारे मतदान कर्मचारी हे मतदान साहित्यासह शनिवारी आपापल्या मतदान केंद्रांवर मुक्कामी रवाना करण्यात आल्याचे या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते आणि उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सांगितले.

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी पीएमपीएमएलच्या १०२ बसेस, ८ मिनीबस आणि १२ जीपद्वारे सर्व मतदान कर्मचारी हे शनिवारी दुपारी मतदान केंद्रांवर मुक्कामी रवाना करण्यात आल्याचे या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

या दोन्ही पोटनिवडणुकीच्या मतदान कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची पुरेशी खबरदारी घेण्यात आली असून, यानुसार पुरेशा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने, ही पोटनिवडणूक होत आहे.

कसबा पोटनिवडणुकीत एकूण सोळा तर, चिंचवड पोटनिवडणुकीत एकूण २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एका मतदान यंत्रावर कमाल सोळा उमेदवारांची नावे देण्याची तरतूद आहे.

शिवाय नकारात्मक मतदानाचा ‘नोटा’ हा पर्याय उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यामुळे या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रत्येकी दोन मतदानयंत्रे वापरली जाणार आहेत.

मतदारसंघनिहाय मतदार व कार्यरत यंत्रणा कसबा विधानसभा मतदारसंघ

 • एकूण मतदार - २ लाख ७५ हजार ६७९

 • एकूणमध्ये पुरुष मतदार -१ लाख ३६ हजार ९८४

 • एकूणमध्ये महिला मतदार -१ लाख ३८ हजार ६९०

 • तृतीयपंथी मतदार - ०५

 • एकूण मतदान केंद्र - २७०

 • मतदानासाठी नियुक्त कर्मचारी - १ हजार २५०

 • मतदानासाठी राखीव पथके - २७

 • पोलिस बंदोबस्त - ८३ पोलिस अधिकारी व ६०० पोलिस तैनात

चिंचवड विधानसभा मतदारसंघ

 • एकूण मतदार --- ५ लाख ६८ हजार ९५४

 • एकूणमध्ये पुरुष मतदार --- ३ लाख २ हजार ९४६

 • एकूणमध्ये महिला मतदार --- २ लाख ६५ हजार ९४७

 • दिव्यांग मतदारांची संख्या --- ६ हजार ६७०

 • तृतीयपंथी मतदार --- ३४

 • एकूण मतदान केंद्र --- ५१०

 • मतदानासाठी नियुक्त कर्मचारी --- तीन हजार

 • मतदानासाठी राखीव पथके --- ५१

 • पोलिस बंदोबस्त --- ७२५ अधिकारी व ३ हजार ७०७ पोलिस तैनात

 • मतदानासाठी बारापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा अनिवार्य

मतदार ओळखपत्र

 • आधारकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, बॅंक किंवा टपाल कार्यालयाचे छायाचित्र असलेले पासबुक

 • श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड

 • वाहन चालक परवाना, पॅनकार्ड

 • राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे स्मार्टकार्ड

 • भारतीय पारपत्र (पासपोर्ट)

 • छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन दस्तावेज

 • राज्य, केंद्र सरकार किंवा सार्वजनिक उपक्रम व कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्रासह ओळखपत्र

 • खासदार, आमदारांना दिलेले त्यांचे अधिकृत ओळखपत्र

 • केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे दिव्यांगत्वाचे ओळखपत्र

परदेशातील मतदारांसाठी मूळ भारतीय पासपोर्ट अनिवार्य

कसबा किंवा चिंचवड या दोन्हीपैकी कोणत्याही विधानसभा मतदारसंघातील मतदार हे परदेशात राहत असतील तर, अशा परदेशातील मतदारांना त्यांची ओळख पटवून देण्यासाठी त्यांना त्यांचा मूळ भारतीय पासपोर्ट सादर करावा लागेल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.