पिकांच्या नुकसानीचे तत्‍काळ पंचनामे करा : जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

राज्यातील अतिवृष्टी व पुरपस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरसींगद्वारे संवाद साधला.

पुणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे ग्रामीण भागामध्ये खरीप, बागायती, जिरायती, हंगामी पिके, तसेच फळबागांना मोठा फटका बसला आहे. मोठया प्रमाणामध्ये शेती क्षेत्र बाधित झाले आहे. तसेच शहरी भागामध्ये घरांचे नुकसान झाले आहे. याबाबतचे पंचनामे चार दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.

- सीमाप्रश्नी मराठी जनता रस्त्यावर

संबंधित तालुक्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी संयुक्‍तपणे पंचनामे करावेत, असेही जिल्‍हाधिकारी राम यांनी स्‍पष्‍ट केले.

जिल्हा प्रशासनाकडून आपदग्रस्तांना तातडीने करावयाची मदत देण्यात आली आहे. महापालिका तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत देखील पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. याविषयी तात्काळ कार्यवाही करुन प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश राम यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले.

- राज्य सरकार खंबीरपणे शेतकर्‍यांच्या पाठिशी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील अतिवृष्टी व पुरपस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरसींगद्वारे संवाद साधला. जिल्हाधिकारी राम यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटूंबांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत आणि त्यांच्या पुनर्वसनाबाबत तसेच ग्रामीण भागातील पिकांचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.

या यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या तपशीलावरुन संबंधितांना नुकसान भरपाई मिळण्याकरीता जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली. 

- तब्बल 30 जेसीबींनी गुलाल उधळत रोहित पवार यांची मिरवणूक

संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक 1077

नुकसानीबाबत काही शंका असल्‍यास टोल फ्री क्रमांक 1077 आणि पुणे येथील आपत्ती नियंत्रण कक्षाचा क्रमांक 020- 26123371 येथे संपर्क करावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune District Collector orders about making immediate report of crop damage due to rain and flood