जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना धीर 

जयराम कुंभार
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

बारामती तालुक्यातील सुपे परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी आज शेतात जाऊन पाहणी केली व थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून धीर दिला. 

सुपे (पुणे) : येथे व परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी आज शेतात जाऊन पाहणी केली व थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून धीर दिला. 

या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना, कर्ज काढले होते का? किती काढले होते? आदींची विचारणा करून नुकसानाची बारकाईने माहिती घेतली. अतिवृष्टीमुळे शेतजमीन वाहून झालेले नुकसान असो किंवा घरांची पडझड असो, निकषानुसार सर्वांचे पंचनामे करण्यात येऊन नुकसान भरपाई मिळेल, असा धीरही त्यांनी शेतकऱ्यांना दिला. 

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघटमल, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ आदी उपस्थित होते. 

दरम्यान, अतिवृष्टीमुळे मोरगावच्या कऱ्हानदीवरील सुमारे 15 बंधारे फुटून शेती व पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य भरत खैरे यांनी दिली. नुकसान झालेल्या काही बंधाऱ्यांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी इंधन खर्च देण्याची ग्वाही त्यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune District Collectors provide relief to disadvantaged farmers