#कारणराजकारण इंदापूर, भोर, पुरंदर काँग्रेसला सोडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील खडकवासलासह अकरा विधानसभा मतदारसंघांतील सात जागा काँग्रेसला द्याव्यात आणि या सातपैकी भोर, इंदापूर व पुरंदर या तीन त्वरित काँग्रेससाठी जाहीर कराव्यात, अशी मागणी जिल्हा काँग्रेसने केली.

पुणे - पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील खडकवासलासह अकरा विधानसभा मतदारसंघांतील सात जागा काँग्रेसला द्याव्यात आणि या सातपैकी भोर, इंदापूर व पुरंदर या तीन त्वरित काँग्रेससाठी जाहीर कराव्यात, अशी मागणी जिल्हा काँग्रेसने केली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत या जागा काँग्रेसला मिळाल्या नाहीत, तर जिल्ह्यातील सर्व जागा स्वबळावर लढविण्यात येतील, असा इशाराही जिल्हा काँग्रेसने मंगळवारी (ता. २७) दिला.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विधानसभा निवडणुकीबाबत बैठक घेण्यात आली. तेव्हा कार्यकर्त्यांनी ही मागणी केली. याबाबतचा ठराव काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप बाठे यांनी मांडला. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील इंदापूर, भोर, पुरंदरसह जुन्नर, खेड, मावळ आणि खडकवासला असे सात मतदारसंघ काँग्रेसने मागितले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मदत केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघात विजयी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत या सात जागा सोडल्या पाहिजेत, असे ठरावात नमूद केले आहे. या सर्व मतदारसंघांत काँग्रेसची संघटनात्मक ताकद मोठी आहे. त्यामुळे येथे काँग्रेसच्या उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता आहे, असा दावाही केला आहे.

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे इंदापूर, भोरचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे हे भोर आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप हे पुरंदर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. दरम्यान, भोर आणि इंदापूरची जागा पूर्वी काँग्रेसकडे होती. परंतु, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटल्याने जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांतून दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. त्यात भोरची जागा कायम राखण्यात काँग्रेसला यश आले. पण, इंदापूरची जागा गमवावी लागली. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय भरणे विजयी झाले. काँग्रेसच्या या नव्या मागणीमुळे आमदार भरणे यांची उमेदवारी धोक्‍यात आली असून, राष्ट्रवादीकडे पूर्वीपासून असलेल्या पुरंदरच्या जागेवरही पाणी सोडावे लागते की काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या बैठकीला संजय जगताप, देविदास भन्साळी, प्रदेश प्रतिनिधी दत्तात्रेय गवळी, कौस्तुभ गुजर, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष संग्राम मोहोळ, खजिनदार महेश ढमढेरे, सरचिटणीस पृथ्वीराज पाटील, काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सीमा सावंत, युवक आघाडी अध्यक्ष सोमनाथ दौंडकर आदींसह सर्व सेलचे अध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune District Congress demands that Bhor, Indapur and Purandar be declared immediately for three congress