Vidhan Sabha 2019 : पुणे जिल्ह्यात आघाडीची अस्तित्वाची लढाई

Vidhan Sabha 2019 : पुणे जिल्ह्यात आघाडीची अस्तित्वाची लढाई

विधानसभा 2019 
जिल्ह्यातील राजकारणात यापूर्वी राष्ट्रवादीचा एकछत्री अंमल होता. परंतु, आता त्याला तडे गेले आहेत अन्‌ त्याची सुरवात गेल्या विधासनभेच्या निवडणुकीपासून झाली. इंदापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर झालेला पराभव हर्षवर्धन पाटील यांना जिव्हारी लागला अन्‌ यंदा नवी राजकीय समीकरणे उदयाला आली आहेत.

‘राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला’ अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत इंदापूर विधानसभा मतदारसंघावरून झालेली चर्चा राज्यात सर्वदूर पसरली. अन्‌ त्यातूनच पश्‍चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते आणि इंदापूरमधील माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे भाजपला शत-प्रतिशतला बळ मिळणार असले, तरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आता काँग्रेसच्या मदतीने अस्तित्वाची लढाई लढणार, अशीच चिन्हे आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच खुद्द मैदानात उतरले आहेत. तर, भाजपने पुन्हा एकदा बारामतीचा गड सर करण्यासाठी बाह्या सरसावल्या आहेत. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि आंबेगाव या राष्ट्रवादी काँग्रेसकडे; तर भोर-वेल्ह्याची जागा काँग्रेसकडे होती. मावळ आणि शिरूरची जागा भाजपने मिळविली; तर पुरंदर, खेड-आळंदीची जागा शिवसेनेने राखली. दौंडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे राहुल कुल आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यातील एकमेव आमदार लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात युतीकडे पाच, तर आघाडीकडे चार आमदार आहेत. मावळचे आमदार बाळा भेगडे यांना मंत्रिपद देऊन जिल्ह्यात ताकद वाढविण्यासाठी भाजपने पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील राजकारणात यापूर्वी राष्ट्रवादीचा एकछत्री अंमल होता. परंतु, आता त्याला तडे गेले आहेत अन्‌ त्याची सुरवात गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून झाली. इंदापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर झालेला पराभव हर्षवर्धन पाटील यांना जिव्हारी लागला अन्‌ यंदा नवी राजकीय समीकरणे उदयाला आली आहेत.

आघाडीचे जागावाटप जवळजवळ निश्‍चित
आघाडीमध्ये पुरंदर, भोर आणि जुन्नर या जागा काँग्रेस लढविणार; उर्वरित बारामती, इंदापूर, दौंड, आंबेगाव, शिरूर, खेड-आळंदी, मावळ या सात जागा राष्ट्रवादी लढविणार, अशी चिन्हे आहेत. भाजप-शिवसेनेची युती झाली; तर भाजपच्या वाट्याला मावळ, शिरूर या विद्यमानांच्या जागांसह बारामती, इंदापूर, दौंड जाऊ शकतात; तर शिवसेना पुरंदर, खेड-आळंदी या विद्यमानांच्या जागांसह जुन्नर, आंबेगाव अन्‌ भोरसाठी मैदानात उतरेल, अशी चिन्हे आहेत.

दौंडमध्ये कुल ‘रासप’तर्फेच पुन्हा रिंगणात उतरतील. इंदापूरची जागा यंदा भाजप लढविणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट सांगत आहेत. त्यामुळे युती झाली, तर मित्रपक्षांसह भाजप आणि शिवसेना प्रत्येकी पाच जागांवर लढत देतील, अशी चिन्हे आहेत. मात्र, ‘रासप’ने इंदापूरसाठीही जोर लावला आहे. त्यांची समजूत मुख्यमंत्री कशी काढणार, याबद्दल कुतूहल आहे.

इंदापूरमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे पवार कुटुंबीय यंदाही दत्तात्रेय भरणे यांच्यासाठी ताकद लावतील, यात शंका नाही; तर हर्षवर्धन पाटील यांचा विजय भाजपसाठी प्रतिष्ठेचा ठरणार आहे. राज्यातील चुरशीच्या लढतींमध्ये इंदापूरचा समावेश असेल. शिवसेनेचा ‘बेस’ असलेल्या आंबेगाव, जुन्नरमध्ये या वेळी लक्षवेधी लढत होईल. भोर मतदारसंघ भाजपलाही हवा असला, तरी सक्षम उमेदवार असल्यामुळे शिवसेना तेथेदेखील जोर लावण्याची चिन्हे आहेत. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात ‘सरप्राइज’ उमेदवार देण्याची भाजपची व्यूहरचना असली, तरी तो उमेदवार अजून दृष्टिक्षेपातही नाही. पुरंदर यंदा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादी राजी झाल्यामुळे सासवडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना हुरूप आला आहे.

पिंपरीमध्ये बदलाची मागणी 
पिंपरी, चिंचवड आणि भोसरीमध्ये अनुक्रमे शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार, भाजपचे लक्ष्मण जगताप आणि अपक्ष महेश लांडगे आमदार आहेत. लांडगे यंदा भाजपच्या उमेदवारीवर लढतील, अशी दाट शक्‍यता आहे. तर, पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा अगदी अलिकडील काळापर्यंत बालेकिल्ला राहिला होता. परंतु, गेल्या पाच वर्षांत समीकरणे बदलली आहेत. आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला पिंपरी मतदारसंघ हवा आहे. तर, भोसरी आणि चिंचवड राष्ट्रवादी लढवेल. पिंपरी मतदारसंघही भाजपला हवा असून, त्याबदल्यात शिवसेनेला पुण्यातील कॅंटोन्मेंट द्यावा, अशीही मागणी तेथून होत आहे.

पक्षांतरामुळे जिल्ह्यात खळबळ
काँग्रेसमधून हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीतून जालिंदर कामठे, राजेंद्र थिटे आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राहुल कुल आणि महेश लांडगे यांचीसुद्धा भाजपशी जवळीक आहे. ‘मनसे’च्या आमदाराने शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना पक्षाकडून तिकिटाची खात्री असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आतापर्यंत तालुक्‍यात शिवसेनेचा किल्ला लढविणाऱ्या आशा बुचके यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. या सर्व घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्र ढवळून निघाले असून, घडामोडींना वेग आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com