पुणे जिल्ह्यातील २४ पैकी १८ धरणे ‘फुल्ल’

सकाळ वृत्‍तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

उजनी धरणात ४९ टक्के पाणीसाठा
पुणे जिल्ह्यातील धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी नदीत सोडण्यात येत आहे. हे पाणी उजनी धरणात जाऊन मिळते. उजनी धरणाच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. उजनी धरणात २६.५४ टीएमसी म्हणजे ४९.५५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. रविवारी दिवसभरात उजनी धरणात १ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. एक जूनपासून उजनी धरणात अवघा १२२ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

पुणे - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळीतील धरणांबरोबरच जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील धरणांच्या परिसरात पावसाचा जोर रविवारीदेखील कायम राहिला. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. जिल्ह्यातील २४ पैकी १८ धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, या धरणांमधून नदीमध्ये पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, सर्वच धरणांच्या परिसरात रविवारीसुद्धा पावसाचा जोर कायम असल्याने धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढविण्यात आला आहे. 

मागील आठवड्यापासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. शनिवारी-रविवारी या दोन दिवशी पावसाचा जोर अधिकच होता. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने धरणात जमा होणारे पाण्याचे प्रमाणही वाढले. जिल्ह्यातील कळमोडी, आंद्रा, पवना, वरसगाव, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, नीरा देवधर, मुळशी आदी धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

रविवारी दिवसभरात सर्वाधिक पाऊस हा गुंजवणी धरण परिसरात झाला. या ठिकाणी ८७ मिमी पाऊस झाला. नीरा देवघरमध्ये ७८ मिमी, वरसगावमध्ये ७० मिमी, पानशेतमध्ये ६७ मिमी, मुळशीमध्ये ५५ मिमी, खडकवासलामध्ये २० मिमी, पवना धरणात ४९ मिमी, भामा आसखेडमध्ये ४५ मिमी, वडिवळे धरण परिसरात ७२ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune District Dam Full Water Rain