पुणे जिल्हाच आरोग्यवर्धिनी

Doctor
Doctor

भवानीनगर - सरकारी दवाखान्यातील सेवा अधिक बळकट करून गावातच रुग्णांना आरोग्याच्या सेवा अधिकाधिक पोचविण्यासाठी जिल्ह्यातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणून मान्यता मिळाली होती. मात्र, जिल्हा परिषद सभापती प्रवीण माने यांच्या पाठपुराव्यानंतर संपूर्ण जिल्हाच ‘आरोग्यवर्धिनी’ करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. पुणे जिल्ह्याचे हे मोठे यश मानले जात असून, वाड्यावस्त्यांवरही आता १३ सेवा मोफत मिळतील.

पुणे जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेतून यापूर्वी जिल्ह्यातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्रे व २५ उपकेंद्रे ही आरोग्यवर्धिनी केंद्रे करण्यात आली. त्याची कामेही अंतिम स्तरावर आहेत. या आरोग्य केंद्रांमधून आरोग्याशी संबंधित १३ सेवा मोफत पुरवल्या जाणार आहेत. या १३ सेवा नागरिकांच्या अत्यावश्‍यक जीवनशैलीशी निगडित आहेत, त्यामुळे गेली दोन वर्षे सातत्याने आरोग्य क्षेत्रात वैविध्यपूर्ण प्रयोग करून जिल्हा आरोग्यात आघाडीवर ठेवलेल्या सभापती प्रवीण माने यांनी संपूर्ण जिल्ह्याला ही सुविधा देण्यासाठी पाठपुरावा केला आणि सरकारने सर्वच केंद्र व उपकेंद्रे आरोग्यवर्धिनी योजनेच्या छताखाली आणण्यास परवानगी दिली.

आता जिल्ह्यातील ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ५३९ उपकेंद्रे ही आरोग्यवर्धिनी केंद्र किंवा उपकेंद्रात रूपांतरित होणार आहेत. या ठिकाणी रुग्णांना प्रतिबंधात्मक व उपचाराची सेवा देण्याबरोबरच प्रयोगशाळेतील तपासण्या व औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत. या दवाखान्यांमध्ये विशेषतः योगाशी संबंधित सल्ला, मार्गदर्शनही नव्याने मिळणार आहे, याचा समावेश या नव्या योजनेत करण्यात आला आहे.

या १३ सेवा मोफत
    जिल्ह्यातील निवडण्यात आलेल्या ३० दवाखान्यांमध्ये प्रसूतिपूर्व व प्रसूतीच्या सेवा 
    नवजात अर्भक व नवजात बालकांना दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा 
     कुटुंब नियोजन, गर्भनिरोधक व आवश्‍यक आरोग्यसेवा
     बाल्य व किशोरवयीन आजार, लसीकरण सेवा
  संसर्गजन्य रोग नियोजन व सामान्य रोगांची बाह्य रुग्णसेवा
  संसर्गजन्य रोगांची तपासणी व प्रतिबंधात्मक नियोजन
  असंसर्गजन्य रोगांची तपासणी व प्रतिबंधात्मक नियोजन
  मानसिक आरोग्य तपासणी व उपचार
  नाक, कान, घसा व डोळे या आजारासंबंधीच्या सेवा
  दात व मौखिक आरोग्याच्या सेवा
  वाढत्या वयातील आजारावरील उपचार.
  प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा. 
  योग सूत्र

जिल्ह्यात यापूर्वी ३० प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळाली होती. मात्र, पुणे जिल्हा हा राज्यात आरोग्याच्या बाबतीत आघाडीवर असल्याने हे एक राज्यातील मॉडेल बनण्याच्या दृष्टीने सर्वच केंद्रे व उपकेंद्रांना आरोग्यवर्धिनीमध्ये रूपांतरित करण्यास मंजुरी मिळाली. माझ्या सभापतिपदाच्या कालखंडातील हा अत्यंत समाधानकारक निर्णय असून जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून जिल्हा कायम आघाडीवर राहील असा विश्वास आहे.
- प्रवीण माने, सभापती, आरोग्य व बांधकाम, जिल्हा परिषद पुणे

५३९ बीएएमएस अधिकाऱ्यांची भरती
पुणे जिल्ह्यात आरोग्यवर्धिनी योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आता उपकेंद्रांनाही ‘बीएएमएस’ मिळणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेंतर्गत ५३९ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी पदभरती केली जाणार आहेत, असे सभापती प्रवीण माने यांनी सांगितले. आरोग्यवर्धिनी सेवेसाठी उपकेंद्रांमध्येही डॉक्‍टर उपस्थित राहिले पाहिजे या हेतूने येथे नव्याने डॉक्‍टरांची पदे निर्माण करण्यास मंजुरी मिळाली आहे. येत्या काही दिवसांतच या भरतीचे निकष जाहीर होतील.

उपकेंद्रांचे नशीब उजळले...
जिल्ह्यात तब्बल ५३९ आरोग्य उपकेंद्रे आहेत. त्यांची आजवरची स्थिती पाहिली तर काही उपकेंद्रे लसीकरण व जुजबी उपचारापुरतीच मर्यादीत आहेत. मात्र, आता थेट उपकेंद्रातच १३ सेवा मोफत मिळणार व त्या उपकेंद्रांना आरोग्य पर्यवेक्षक नव्हे तर आरोग्य अधिकारी मिळणार म्हटल्यावर या उपकेंद्रांचे नशीबच उजळून निघणार आहे. दुर्गम भागातील या उपकेंद्रांना साहजिकच प्राथमिक आरोग्य केंद्राएवढेच महत्त्व येईल. त्याचा सामान्य नागरिक व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com