मृत्यूनंतरही हेळसांड (व्हिडिओ)

मृत्यूनंतरही हेळसांड (व्हिडिओ)

बारामतीत समन्वयामुळे नातेवाइकांना दिलासा
बारामती शहर : बारामती तालुक्‍यात शहरातील शवविच्छेदन सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात, तर तालुक्‍याच्या भागातील रुई ग्रामीण रुग्णालयात केले जाते. किरकोळ तक्रारींचा अपवाद वगळता या ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी येथे नाहीत. विशेष बाब म्हणजे पोलिस व वैद्यकीय प्रशासन यांच्या समन्वयातून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना मनस्ताप होऊ नये याची काळजी घेतली जाते. 

बारामतीच्या या दोन्ही रुग्णालयांकडे रुग्णवाहिका आहेत. मात्र शववाहिका नाही. बारामती नगरपालिकेकडे एकच  शववाहिका आहे, ती नगरपालिका हद्दीतच वापरली जाते. इतर वेळेस नाइलाजाने रुग्णवाहिकाच शव  घेऊन जाते. रुईच्या रुग्णालयात वर्षाला सरासरी ८०, तर सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात १२० शवविच्छेदन  होतात. येथे डॉक्‍टरांची उपलब्धता असते, मात्र शवविच्छेदनासाठी आवश्‍यक कर्मचारी मात्र खासगी तत्त्वावर वापरावा लागतो. रुई ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता कर्मचाऱ्यांची दोन पदे मंजूर आहेत, मात्र दोन्ही पदे रिक्त आहेत.

रुईतील यंत्रणा जुनी
रुई रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहाची इमारत तुलनेने जुनी असल्याने येथे दुरुस्तीची गरज आहे. रुई येथे दोन मृतदेह काही तासांपर्यंत शीतपेटीत ठेवण्याची सोय असली, तरी प्रत्यक्षात ही यंत्रणा जुनाट झाली आहे. अनेकदा रात्रभर किंवा नातेवाईक येईपर्यंत शवविच्छेदनानंतर येथे मृतदेह ठेवले जातात. अपवादात्मक परिस्थितीतच येथील यंत्रणेवर ताण येतो.

पदेनिर्मितीची गरज
शवविच्छेदन हा विषय गुंतागुंतीचा असल्याने यासाठी नवीन पदांच्या निर्मितीची गरज आहे. अनेकदा डॉक्‍टर असतात, पंचनामाही झालेला असतो, सगळी तयारी होते. मात्र शवविच्छेदन कर्मचारी बाहेरून खासगी तत्त्वावर मागवावा लागतो. त्यामुळे शासकीय पातळीवर शवविच्छेदन सहायक असे पद निर्माण करून ते भरले जावे अशी आरोग्य विभागाची भूमिका आहे.
************************************************
अपुरी जागा, कर्मचाऱ्यांचा अभाव अन्‌ वाढता ताण 
यवत : यवत येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन गृह आहे. वर्षभरात सुमारे दिडशे ते दोनशे शवविच्छेदन येथे होत असतात. येथील सुविधा फारशा समाधानकारक आहेत, असे म्हणता येणार नाही. अपुरी जागा, अपुरा कामगार वर्ग यांमुळे येथे कामाचा ताण वाढत आहे. मृतांच्या नातलगांना अनेकदा येथे वाट पाहात थांबण्याची वेळ येते.

यवत परिसरातून महामार्ग व लोहमार्ग जातो. येथून नवा मुठा व बेबी कालवा वाहतो. अपघात, घातपात, आत्महत्या यामुळे येथे मृतांचे प्रमाण मोठे आहे. दर महिन्याला पंधरा ते वीस मृतदेहांचे शवविच्छेदन येथे केले जाते, त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी यंत्रणा उपलब्ध नाही. नियमित काम पाहणारे आरोग्य अधिकारीच शवविच्छेदनाचे सर्व सोपस्कार पार पाडतात. त्यांच्या मदतीला एक प्रशिक्षित कटर असणे गरजेचे आहे. मात्र, येथे संतोष जावळे हे सफाई कर्मचारीच मागील अनेक दिवसांपासून कटरचे काम पाहात आहेत. या रुग्णालयाला शववाहिका उपलब्ध नाही. सरकारी किंवा खासगी रुग्णवाहिकेतूनच शवांची वाहतूक केली जाते. शव साठवण्यासाठी येथे दोन वातानुकूलित शवपेट्या आहेत, मात्र त्या पुरेशा नाहीत. किमान चार शव साठवण्याची सुविधा येथे गरजेची असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. मागील वर्षी येथे १७० शवविच्छेदन झाल्याचे सांगण्यात आले.

शवविच्छेदनाच्या प्रमाणानुसार येथे किमान दोन कट्ट्यांचे शवविच्छेदनगृह हवे आहे. येथे शवविच्छेदन प्रक्रियेचा ताण जास्त आहे. त्यासाठी स्वतंत्र तज्ज्ञ उपलब्ध नाही. आपली ड्युटी संभाळून येथील आरोग्य अधिकाऱ्यांना हे काम करावे लागत आहे. 
- डॉ. शशिकांत इरवाडकर, अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय 

बेवारसांचा वारस
येथे शवविच्छेदनामध्ये कटर म्हणून काम पाहणारा कर्मचारी संतोष जावळे हा समाजशील आहे. अनेकदा बेवारस शवांचे विच्छेदन झाल्यावर त्याचे पुढील सोपस्कार करण्यास कोणी उपलब्ध नसते. अशा वेळी जावळे स्वतःच्या खर्चाने त्यासाठी कापड व मृतदेह वेष्टीत करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू घेऊन येतात. संबंधितांच्या नातलगांचा तपास लवकरात लवकर लावा अशी कळवळून विनंती ते पोलिस व पत्रकारांना करत असतात. तेव्हा जावळे या बेवारसांचा वारस असल्याचे क्षणभर वाटते.

************************************************

सुपे केंद्रात पाणी टंचाई 
सुपे : सुपे (ता. बारामती) येथील ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात पाण्याची सुविधा नाही. त्यामुळे संबंधित डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची गैरसोय होते. संबंधित प्रशिक्षीत कर्मचारी दुसऱ्या रुग्णालयाकडून बोलवावा लागत असल्याने शवविच्छेदनासाठीचा वेळ वाढतो.  

येथील शवविच्छेदनगृहाचे  
छत गळत असून, पुरेशा प्रकाशासाठी छतावर ठेवलेल्या झरोक्‍याच्या  काचा फुटल्याने पावसाळ्यात थेट  पाणी टेबलवर पडते. पुरेशा पाण्याअभावी आवश्‍यक तेवढी स्वच्छता दिसत नाही. विजेची  परिपूर्ण सुविधा नसल्याने रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करण्याची गैरसोय होते. शवविच्छेदन करणाऱ्या प्रशिक्षित  कायम कर्मचाऱ्याची नेमणूक नसल्याने संबंधित कर्मचाऱ्याला जेजुरी, यवत किंवा बारामतीहून बोलवावे लागते. शव राखून ठेवण्यासाठी शीतपेटीची सुविधा नाही. 

गेल्या वर्षात येथे एकूण ४९ शवविच्छेदन करण्यात आले. रुग्णालयासाठी तज्ज्ञ डॉक्‍टर नाहीत. शवविच्छेदन करणारा कर्मचारी बाहेरून बोलवावा लागत असल्याने कर्मचारी उपलब्ध होईपर्यंत संबंधित नातेवाइकांना प्रतीक्षा करावी लागते. रुग्णालयाच्या संरक्षक भिंती लगतचे स्थानिक रहिवाशी आत कचरा टाकतात. त्यामुळे आवारात घाणीचे प्रमाण वाढते. याविषयी ग्रामपंचायतीला पत्राद्वारे यापूर्वीच कळविल्याची माहिती कार्यालयातून देण्यात आली.

विजेसाठी आणखी दिवे व आवारातही अधिक क्षमतेचे दिवे बसवले जाणार आहेत. जलवाहिनी खंडित झाल्याने वॉशबेसिन बंद आहेत. पाण्याची टाकी बसवून जलवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात येणार आहे.
- डॉ. लता पांढरे, वैद्यकीय अधीक्षक 

************************************************

लासुर्ण्यामध्ये पैसे दिल्यानंतरच शवविच्छेदन 
वालचंदनगर : लासुर्णे (ता. इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन सुविधा उपलब्ध आहे. मात्र शवविच्छेदन करण्यासाठी कर्मचारी नसल्याने पैसे दिल्याशिवाय शवविच्छेदन होत नाही. त्याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होतो.

इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागामध्ये वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे ४० गावांचा लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राशी संबध येत असतो. येथे शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र शवविच्छेदन करण्यासाठी कर्मचाऱ्याची नेमणूक नसल्यामुळे गावातील खासगी व्यक्तीकडून शवविच्छेदन करून घ्यावे लागते. एखादी व्यक्ती मयत होऊन शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर सर्वप्रथम शवविच्छेदन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला मागेल ती रक्कम द्यावी लागते. अनेकदा ही रक्कम सुमारे दोन हजार रुपये असते. ती घेतल्यानंतर शवविच्छेदनास सुरवात केली होते. तसेच शवविच्छेदनासाठी स्वतंत्र डॉक्‍टरांची नेमणूक नसल्यामुळे एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर कामाचा ताण येतो. रात्रीच्या वेळी एखाद्याचा मृत्यू झाला असल्यास शवविच्छेदन करण्यासाठी सात ते आठ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. येथे शव राखून ठेवण्याची सुविधा नाही.

खिडकीच्या फुटलेल्या  काचा, पाण्याची कमतरता, अपुरा प्रकाश
लासुर्णे येथील शवविच्छेदनगृहाच्या काचा फुटल्या आहेत. अडगळीसारख्या खोलीमध्ये शवविच्छेदन करावे लागते. खोलीच्या वरच्या बाजूला पाण्याची टाकी आहे. मात्र टाकीमध्ये पाणी नसते. दुसरीकडून पाणी आणावे लागते. तसेच रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशामुळे अनेक अडचणी येतात. शवविच्छेदनासाठीची असणारी जागा, खोलीची लांबी व रुंदी कमी आहे.

शिक्रापुरात ऐनवेळी उडते तारांबळ
शिक्रापूर : महिन्याला सरासरी १५ शवविच्छेदन कराव्या लागणाऱ्या येथील ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात, हा विभाग सुरू झाल्यापासून कटरची जागा रिक्त आहे. या ठिकाणी शवविच्छेदन विभागाच्या खूप मोठ्या तक्रारी नसल्या, तरी फक्त कंत्राटी कटरच या रुग्णालयाच्या नशिबात आहेत. त्यामुळे अचानक किंवा ऐनवेळी उद्‌भविलेल्या परिस्थितीला सामोरे जाताना तारांबळ उडते.

शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय २०१४ पासून नवीन सुसज्ज इमारतीत सुरू झाले. नवीन इमारतीत शवविच्छेदन विभागही सुरू झाला. तीन ते चार दालने असलेला हा विभाग विस्तीर्ण असला, तरी येथे मृतदेहाची चिरफाड करण्यासाठी असलेली कटर ही पोस्ट अद्यापही रिक्त आहे. यासाठी स्थानिक गोविंद शिर्के हे गृहस्थ कटरचे काम करतात. मात्र ते कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार असल्याने केवळ सहा हजार रुपये महिन्याच्या वेतनावर काम करतात. त्यातच येथे चार निवासी डॉक्‍टर नियुक्त आहेत. मात्र त्यातील एक वरिष्ठ अधिकारी नुकतेच निवृत्त झाल्याने येथे फक्त तीनच डॉक्‍टर्स कार्यरत आहेत. शवविच्छेदन विभाग हाताळणे तीनही डॉक्‍टरांसाठी जिकरीचे आहे. आधीच दररोज २५० रुग्णांचा बाह्यरुग्ण विभाग आणि बाळंतपणासह आंतररुग्ण विभागाचा ताण केवळ तीन डॉक्‍टरांनाच सहन करावा लागत आहे. 

कंत्राटी कटर असलेले शिर्के यांच्यामुळे आम्हाला मदत होते. मात्र नियमित रुग्ण आणि शवविच्छेदनासाठी नातेवाइकांची घाई पाहता आम्हाला अनेकदा कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातच एखाद्या मृतदेहाचा डीएनए किंवा अगदी सडलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन करायचे म्हटले, की त्यासाठी तज्ज्ञ डॉक्‍टर्स येथे नसतात. मृतदेह पुण्यात ससूनला पाठवायचे म्हटले, की अनेकदा वाद आणि गैरसमज होतात आणि स्टाफची तारांबळ उडते.
- डॉ. हेमा देठे, आरोग्याधिकारी

तुटपुंजा पगार
शवविच्छेदनात मृतदेहाची चिरफाड करण्याचे काम सगळ्यात भयंकर, अस्वच्छ, अनारोग्याचे संक्रमण करणारे आणि भीतिदायक आहे. मात्र शिर्के हे सकाळी सहा वाजता रुग्णालय साफ करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने महिना सहा हजार रुपये असा तुटपुंजा पगार घेतात. इतर वेळी प्रति शवविच्छेदनासाठी शंभर किंवा दोनशे रुपये लोक देतात. गोविंद शिर्के हे तरुण असून, पूर्ण शाकाहारी आणि माळकरी आहेत. त्यांचे काम पाहता अनेक जण आश्‍चर्य व्यक्त करतात.
************************************************

मंचर  रुग्णालयात  २४ तास सुविधा
मंचर : येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाबाबत पूर्वी तक्रारी होत्या. शवविच्छेदनाला विलंब लागत असल्याने रुग्णालयाच्या आवारात नातेवाइकांनी संताप व्यक्त केला होता. पण येथील परिस्थितीत सुधारणा झाली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून शवविच्छेदन करण्यासाठी दोन कटर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे पोलिस पंचनामा हातात मिळाल्यानंतर ताबडतोब शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होते. एक तासानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जातो. येथे २४ तास शवविच्छेदनाची सुविधा आहे. वर्षभरात येथे सरासरी १४० मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाते. 

आंबेगाव तालुक्‍यात पूर्वी फक्त घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले जात होते. १५ वर्षांपासून मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येथे १० फूट लांब व १० फूट रुंदीची शवविच्छेदनाची स्वतंत्र खोली आहे. विजेची व पर्यायी जनरेटरची सोय आहे. शवविच्छेदनासाठी लागणारी सर्व औषधे व हत्यारे येथे उपलब्ध आहेत. या खोलीच्या शेजारीच शवगृह आहे. शवगृहात कूलिंग व्यवस्था आहे. शवगृहात दोन मृतदेह ४८ तास ठेवता येतात. शववाहिका मात्र रुग्णालयात उपलब्ध नाही. येथे एकूण नऊ डॉक्‍टर असून, त्या सर्व डॉक्‍टरांना शवविच्छेदनाचा अधिकार आहे. 

मृतदेह रुग्णालयात आल्यानंतर लवकर मृतदेहाचे शवविच्छेदन व्हावे, अशी नातेवाइकांची अपेक्षा असते. ती योग्यही आहे; पण पोलिस पंचनामा हातात मिळाल्याशिवाय शवविच्छेदनाला कायद्यानुसार सुरवात करता येत नाही. अनेकदा पोलिस पंचनामा प्रत मिळण्यास उशीर होतो. त्यातून गैरसमज होतात. नातेवाइकांच्या रोषाला अनेकदा डॉक्‍टरांना सामोरे जावे लागते. त्यातून मार्ग काढण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा देशमुख यांनी पुढाकार घेतला. रुग्णालयातील दोन कक्ष सेवकांना पुणे येथे शवविच्छेदनाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे येथे २४ तास शवविच्छेदनाची सुविधा आहे. वेळेत नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह दिला जातो.
- डॉ. गणेश पवार, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, मंचर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com