‘स्वच्छ भारत’मध्ये पुणे जिल्हा दुसरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्वच्छता सर्वेक्षणामध्ये राज्यात १६व्या स्थानावर असलेल्या पुणे जिल्ह्याने २०१९ या वर्षात दुसरे स्थान मिळविले आहे. 

पुणे - ग्रामीण भागात स्वच्छतेला प्राधान्य दिले जात असून, जिल्ह्यात गेल्या सात वर्षांत सुमारे पावणेदोन लाख स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात आले आहे, त्यामुळे स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्वच्छता सर्वेक्षणामध्ये राज्यात १६व्या स्थानावर असलेल्या पुणे जिल्ह्याने २०१९ या वर्षात दुसरे स्थान मिळविले आहे. 

जिल्ह्यात २०१३-१४ मध्ये महात्मा गांधी जयंतीदिनी २ ऑक्‍टोबर रोजी ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली. ग्रामीण भागात स्वच्छतेला महत्त्व देण्यासाठी बहुतांश ठिकाणी उघड्यावर शौचास बसण्याची प्रथा बंद करणे गरजेचे होते, त्यासाठी स्वच्छतागृह नसलेल्या कुटुंबांना २ ऑक्‍टोबर २०१९ पर्यंत स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे हा योजनेचा  उद्देश होता.

जिल्ह्यात २०१३-१४ मध्ये एक हजार स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर २०१४-१५ मध्ये १४ हजार, २०१५-१६ मध्ये सुमारे ३० हजार आणि २०१६-१७ मध्ये एक लाख २१ हजार स्वच्छतागृहे बांधण्यात आली. 

त्यानंतर दोन वर्षे ही योजना संथ गतीने राबविण्यात आली. त्या दोन वर्षांत सुमारे दोन हजार स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात आले. परंतु २०१९-२० या वर्षात दहा हजारांहून अधिक स्वच्छतागृहांची बांधकामे झाली, त्यामुळे हा आकडा एक लाख ८० हजारांवर पोचला आहे.

स्वच्छतेबाबत निरीक्षण
पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण अभियान राबविण्यात येत आहे. निवडक गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेबाबत निरीक्षण करण्यात आले. त्यानुसार स्वच्छता सर्वेक्षणात पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यातील सद्य:स्थिती
 स्वच्छतागृह असलेली ग्रामीण कुटुंबे : ६ लाख २८ हजार ९०१ 
 स्वच्छतागृहांचे बांधकाम (२०१२ ते २०१९) : १ लाख ८० हजार ३७७


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune District II in Clean India