Teacher : बदली झालेल्या शिक्षकांना नव्या शाळेवर रुजू होण्यास ३१ मेची डेडलाईन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher Transfer

प्राथमिक शिक्षकांच्या नवीन बदली धोरणानुसार आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील दोन हजार १३६ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या आहेत.

Teacher : बदली झालेल्या शिक्षकांना नव्या शाळेवर रुजू होण्यास ३१ मेची डेडलाईन

पुणे - प्राथमिक शिक्षकांच्या नवीन बदली धोरणानुसार आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील दोन हजार १३६ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या आहेत. बदली झालेल्या शिक्षकांना येत्या १५ मेनंतर जुन्या शाळा सोडण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर नवीन शाळेवर रुजू होण्यासाठी बदल्या झालेल्या सर्व शिक्षकांना ३१ मेची डेडलाईन देण्यात आली आहे. यामुळे यंदा झालेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बदल्यांबाबत झालेला संभ्रम आता दूर झाला आहे.

जिल्हा परिषद शाळांवरील शिक्षकांच्या बदल्या हा विषय ग्रामविकास खात्याच्या अखत्यारित येत आहे. कोरोना संसर्ग, शिक्षकांच्या बदल्यांच्या नवीन धोरणांची अंमलबजावणी आणि या बदल्यांसाठी नव्याने विकसित करण्यात आलेली संगणकीय प्रणालीमुळे मागील तीन वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या झाल्या नव्हत्या. शिक्षकांच्या नवीन बदली धोरणानुसार यंदा पहिल्यांदाच जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

नव्या धोरणानुसार एकाच शाळेवर किमान पाच वर्षे केलेल्या शिक्षकांना या बदली प्रक्रियेत सामावून घेण्यात आले होते. तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांच्या बदल्यांचे नवे धोरण २७ फेब्रुवारी २०१७ ला आणले होते. या धोरणानुसार राज्यस्तरावरून आॅनलाइन पद्धतीने बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निर्णयाला शेकडो शिक्षकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु सरकारने त्यात बदल केला होता.

दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाले. नवीन महाविकास आघाडी सरकारने शिक्षक बदल्यांचे जुने धोरण बदलून शिक्षकांसाठी फायदेशीर ठरणारे, नवीन धोरण अमलात आणले होते. आता या नव्या बदली धोरणानुसार या बदल्या झाल्या आहेत. पुणे जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती ४ फेब्रुवारी २०२० ला स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशींनुसार हे नवीन बदली धोरण अस्तित्वात आले आहे.

जिल्ह्यातील २१३६ शिक्षकांची बदली

शिक्षकांच्या बदल्यांच्या चौथ्या यादीत पुणे जिल्ह्यातील आणखी ९१५ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. याआधी संवर्ग एक, दोन आणि तीनमध्ये पुणे जिल्ह्यातील ९४७ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर सहाव्या फेरीत आणखी २७४ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या सहा फेऱ्यांमध्ये मिळून पुणे जिल्ह्यातील एकूण २ हजार१३६ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

बदल्या कायमस्वरूपी रद्दला शिक्षकांचा विरोध

शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु असल्याने, अनेक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने आपापल्या मूळ जिल्ह्यातील शाळेवर जाता येते. शिवाय नोकरीच्या शेवटच्या टप्प्यात आपापल्या गावाजवळ जाण्याची संधी या बदली प्रक्रियेच्या माध्यमातून मिळत असते. तसेच डोंगरी, दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षकांना सुगम भागातील शाळांवर नियुक्ती घेता येते. पण राज्य सरकारने या बदल्याच जर कायमस्वरूपी रद्द केल्या तर, त्याचा शिक्षकांना नाहक त्रास होणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या कायमस्वरूपी रद्द करण्यास शिक्षकांचा तीव्र विरोध असल्याचे अनेक शिक्षकांना नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.