पुणे जिल्ह्यात ऑक्‍सिजनची चिंता मिटली; मागणी 25 टक्‍क्‍यांनी घटली

Oxygen-Cylinder
Oxygen-Cylinder

पुणे - कोरोना बाधित रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी आवश्‍यक असलेल्या ऑक्‍सिजन सिलिंडरची मागणी जवळपास 25 टक्‍क्‍यांनी घटली आहे. जिल्ह्यात सध्या ऑक्‍सिजन सिलिंडरची उपलब्धता मुबलक प्रमाणात असून, उत्पादक कंपन्यांकडून सुरळीत पुरवठा होत असल्यामुळे ऑक्‍सिजनची चिंता मिटली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विभागात आयनॉक्‍स एअर प्रॉडक्‍टस्‌, टायो निप्पॉन ऑक्‍सिजन आणि कोल्हापूर ऑक्‍सिजन अँड ऍसिटिलीन या तीन ऑक्‍सिजन उत्पादक कंपन्यांसह ठाणे जिल्ह्यातूनही ऑक्‍सिजन उपलब्ध होतो. या तीन कंपन्यांकडून साडेतीनशे मेट्रिक टन ऑक्‍सिजनचा पुरवठा केला जात होता. ही मागणी आता 281 मेट्रिक टनवर आली आहे. त्यात पुणे जिल्ह्यासाठी 180 मेट्रिक टन, सांगली 26, सातारा 16, कोल्हापूर 38 आणि सोलापूर जिल्ह्यासाठी 21 मेट्रिक टन ऑक्‍सिजनची गरज भासते. 

चाकण येथील सर्वाधिक क्षमतेचा एअर लिक्विड हा ऑक्‍सिजन उत्पादक प्लॅंट ऑक्‍टोबरअखेर सुरू होणार आहे. पुढील महिन्यात ऑक्‍सिजन मुबलक प्रमाणावर उपलब्ध होईल. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांनाही ऑक्‍सिजन पुरेशा प्रमाणात पुरवठा करणे शक्‍य होणार आहे. 

पुणे विभागात ऑक्‍सिजन सिलिंडर रिफील करणाऱ्या प्लॅंटची संख्या 30 च्या जवळपास आहे. त्यात पुणे जिल्ह्यात 17, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येकी चार, सांगली दोन आणि सोलापूर जिल्ह्यातील तीन ऑक्‍सिजन सिलिंडर रिफील प्लॅंटचा समावेश आहे. राज्य सरकारने वैद्यकीय वापरासाठी ऑक्‍सिजन उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. अन्न व औषधी प्रशासनाकडून ऑक्‍सिजन सिलिंडर रिफील करणाऱ्या युनिटला वैद्यकीय वापरासाठी 24 तासांत परवानगी देण्यात येत आहे. ऑक्‍सिजन पुरवठ्यातील काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. तसेच, राज्य सरकारने ऑक्‍सिजन टॅंकर वाहतूक कोंडीत अडकू नयेत, यासाठी ऑक्‍सिजन टॅंकर्सला रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे. या सर्व नियोजनामुळे ऑक्‍सिजनच्या पुरवठ्यात सुसूत्रता आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 

पुणे विभागातील ऑक्‍सिजनची सद्यस्थिती -
उपलब्धता : 350 मेट्रिक टन 
मागणी : 281 मेट्रिक टन 
सिलिंडर रिफीलिंग प्लॅंट : 30 

कोरोना बाधित रुग्ण संख्येत तुलनेत काही प्रमाणात घट झाली आहे. तसेच, गरज असलेल्या रुग्णांसाठीच ऑक्‍सिजनचा वापर करण्यात यावा, अशा सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या ऑक्‍सिजनच्या मागणीत घट झाल्याचे दिसून येत आहे. 
- एस. बी. पाटील, सह आयुक्‍त, अन्न व औषधी प्रशासन, पुणे विभाग

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com