आजच्या सरकारचा संविधानापेक्षा मनुस्मृतीवर अधिक विश्वास - डॉ. बाबा आढाव

‘उपरा’कार लक्ष्मण माने लिखित ‘किटाळ’ पुस्तकाच्या मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
dr baba adhav
dr baba adhavsakal
Summary

‘उपरा’कार लक्ष्मण माने लिखित ‘किटाळ’ पुस्तकाच्या मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

पुणे - ‘आज एकीकडे आम्ही संविधानाचा स्वीकार करून समानतेच्या तत्वाचा स्वीकार करतो आणि दुसरीकडे सत्यनारायणाच्या पूजेत स्त्रियांना पुरुषांच्या हाताला हात लावायला सांगतो. आम्ही घटनेचे नाव घेतो, पण अशी विषमतावादी संस्कृती जपतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली असली तरी आज त्याचेच उदात्तीकरण सुरू आहे. कारण आजच्या सरकारचा संविधानापेक्षा मनुस्मृतिवर अधिक विश्वास आहे’, अशी परखड टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी बुधवारी केली. इंग्रजांच्या गुलामगिरीपेक्षा कडवे असे, या चातुर्वण्य व्यवस्थेला मोडून काढण्याचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

‘उपरा’कार लक्ष्मण माने लिखित ‘किटाळ’ पुस्तकाच्या मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी लक्ष्मण माने, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, निखिल वागळे, ॲड. जयदेव गायकवाड, ‘मेहता’चे अखिल मेहता आदी उपस्थित होते. डॉ. आढाव म्हणाले, ‘‘लक्ष्मण माने यांच्यावर सहा महिलांनी केलेल्या बलात्कारांच्या आरोपाचे मूळ व्यवस्थेतच आहे. माने ज्या समाजातून येतात, त्या भटक्या-विमुक्त जातीच्या लोकांची प्रगती न पाहावल्यानेच माने यांच्याविरुद्ध हे षडयंत्र रचल्या गेले. आजही या जातींकडे गुन्हेगार म्हणूनच पाहिले जाते. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी न्यायालयीन पातळीसह सांस्कृतिक पातळीवरही चळवळीची गरज आहे.’’

‘किटाळ हे पुस्तक म्हणजे एका सामाजिक कार्यकर्त्याचा आक्रोश आहे. या पुस्तकातून देशातील न्यायव्यवस्था आणि तुरुंगव्यवस्थेचे भयानक वास्तव समोर आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यावर भारताने स्वाक्षरी केली असली, तरी भारतीय पोलीस कधीच त्याचे पालन करत नाहीत’, असे मत वागळे यांनी व्यक्त केले. तसेच, ‘बलात्काराच्या आरोपांवेळी माने यांच्या पाठीशी उभे न राहण्याची चूक पुरोगामी चळवळीतील लोकांनी केली. त्यांनी जाहीरपणे माने यांची माफी मागावी’, असे आवाहनही त्यांनी केले. ‘आरोप झाले त्या काळात कुटुंबाला, मुलांना खूप सोसावे लागले. कायद्याने पण खूप अन्याय केला. परंतु, या काळात बाबा आढाव यांच्यासारखे व्यक्ती, कार्यालयातील सहकारी आणि गरीब कष्टकरी समाजातील माणसे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांचा पाठिंबा आणि कित्येक अनामिक माणसांच्या आशीर्वादाने हा काळ पार करू शकलो’’, अशी भावना माने यांनी व्यक्त केली. अखिल मेहता यांनी प्रास्ताविक केले. संदीप म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. तर, समता माने यांनी आभार मानले.

बाबांचा साधेपणा

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचा बुधवारी (ता. १) वाढदिवस होता. त्यामुळे कार्यक्रमात वाढदिवसानिमित्त उभे राहून त्यांचे अभिष्टचिंतन करण्याचे आवाहन अरुण खोरे यांनी केले. त्यावेळी बाबांनी काहीसे संकोचूनच या शुभेच्छांचा स्वीकार केला. तर, लक्ष्मण माने यांनी बाबांचा सत्कार करायचे सांगताच त्यांनी ‘आपल्या माणसांचा सत्कार करण्याची गरज नाही’, असे सांगून कार्यक्रम पुढे नेण्याची सूचना केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com