पांढरेशुभ्र वस्त्र, निळा फेटा अन्‌ जयघोष 

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti

पुणे : पांढरेशुभ्र वस्त्र, डोक्‍यावर निळा फेटा, कपाळावर "जय भीम'ची रिबन, हातात निळा झेंडा आणि सगळ्यांकडून जोरदारपणे होणारा "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो' असा जयघोष. तो गुरुवारी मध्यरात्रीपासून ते शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत अखंडपणे सुरू होता. तर, दुसरीकडे रांगेत उभे राहून डॉ. आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर भाषणे, पोवाडे, जलसे, भीमगीते ऐकत... छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेबांचे समग्र वाङ्‌मय खरेदी करण्यास प्राधान्य देत लाखो आंबेडकर अनुयायांनी आपल्या लाडक्‍या भीमरायाला अभिवादन केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीचे वातावरण तीन दिवसांपासून शहरात दिसू लागले होते. गुरुवारी मध्यरात्री आंबेडकर अनुयायांच्या आनंद आणि उत्साहाला उधाण आले. पुणे स्टेशन आणि लष्कर परिसरातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच गर्दी झाली होती. सामूहिक बुद्धवंदना झाल्यानंतर पुष्पहार अर्पण करून सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरवात झाली. सकाळी सात वाजता लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच नवीन पांढरेशुभ्र कपडे परिधान केले. त्यानंतर घराजवळील समाजमंदिर, सभागृह व भवनांमध्ये सामूहिक बुद्धवंदनेसाठी सर्वजण एकत्र आले. "बुद्धं.. शरणं.. गच्छामी' ही बुद्धवंदना म्हटल्यानंतर सर्वांनी भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेबांना अभिवादन केले. 

पुणे स्टेशन, कॅम्प, पुणे विद्यापीठ, येरवडा, विश्रांतवाडी यांसह विविध भागांतील पुतळ्यांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायी सहकुटुंब घराबाहेर पडले. उन्हाचा पारा चढला असतानाही अनुयायांमधील उत्साह कमी होत नव्हता. शहर, जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यांतील आंबेडकर अनुयायांची पावले बाबासाहेबांच्या दर्शनासाठी पुणे स्टेशन येथील पुतळ्याकडे वळली. अर्धा-अर्धा तास शांततेत रांगेत उभे राहून त्यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या माता रमाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासही अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली होती. 

शहराच्या विविध भागांत मिरवणुका 
पुतळ्याच्या परिसरात विविध राजकीय पक्ष, संस्था व संघटनांतर्फे भीमगीते, पोवाडे, जलसे व भाषणांचे आयोजन केले होते. सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतल्यानंतर अनेकांची पावले पुस्तकांचे स्टॉल्स व विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी वळली. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन विविध संस्था- संघटनांनी अनुयायांसाठी पाणी, दूध, सरबत, लाडू व भोजनाची व्यवस्था केली होती. तरुण- तरुणी, विद्यार्थिनी व महिलांचे समूह मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी दाखल होत होते. सायंकाळी सहानंतर शहराच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने मिरवणुका निघाल्याचे चित्र होते. 

पुस्तक खरेदीला पसंती 
आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पुस्तक खरेदीला अनुयायांनी पसंती दिली. आंबेडकरांची सर्व पुस्तके, चरित्र, राज्यघटना, शिवाजी कोण होता, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, अण्णा भाऊ साठे यांच्यावरील पुस्तकांना सर्वाधिक पसंती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com