
Pune : राष्ट्र उभारणीत युवकांची महत्त्वाची भूमिका ; डॉ. भागवत कराड
पुणे : जागतिक पातळीवर भारतीय अर्थव्यवस्थेला तिसऱ्या स्थानावर पोचण्यासाठी देशातील प्रामुख्याने युवा वर्गाला बरोबर घेऊन एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी (ता. २३) पुण्यात केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पद्मश्री डॉ. विखे पाटील अध्यासन आणि नॅशनल युवा को-ऑप सोसायटी यांच्या वतीने ‘सहकार क्षेत्रातील युवकांचा सहभाग’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत ते बोलत होते. युवा सोसायटीचे अध्यक्ष राजेश पांडे, विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. कराड म्हणाले, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी नॅशनल युवा सोसायटीसारख्या संस्थांनी काम करावे. यासाठी त्यांना नाबार्ड संस्थेशी जोडून देण्यात येईल. युवा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि संघटनांनी युवकांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
केंद्र सरकारने विकास प्रक्रियेला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्या आहेत. नवे तंत्रज्ञान आणि नवे विचार आत्मसात करण्यात देशातील युवा वर्ग आघाडीवर आहे. त्यांच्या क्षमतेला प्रोत्साहन देऊन देश जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने वेगाने वाटचाल करीत आहे.
पुणे विद्यापीठात सहकार क्षेत्रातील संशोधन केंद्र-
आगामी काळात नॅशनल युवा को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहकार क्षेत्रातील संशोधन केंद्र सुरू केले जाईल, अशी घोषणा प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांनी केली. अध्यासनाचे प्रमुख डॉ. मुकुंद तापकीर यांनी स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांचेही भाषण झाले.